हरितालिका हे व्रत कुमारिका, सवाष्णींच्या बरोबरच विधवा स्त्रियाही करतात. हे या व्रताचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात. सवाष्ण स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात. तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. यंदा ३० ऑगस्ट रोजी हरितालिका आहे.
हरतालिका व्रताचा पूजाविधी: हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करून मग पूजा करवी. पूजेचे स्थान स्वच्छ आणि सुशोभित करावे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. स्वत: व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला प्रारंभ करावा.
त्या चौरंगावर कलश ठेवून पूर्णपात्रात अथवा चौरंगावर कोरे रंगीत वस्त्र घालून त्यावर तांदूळ पसरवून पार्वतीमातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी. संकल्प, गणेशपूजन, शिवपार्वतीमातेचे ध्यान करुन त्यांची षोडशोपचारी पूजा करावी. उपलब्ध फळे, फुले अर्पण करून..
शिवायै शिवरूपायै मंङगलायै महेश्वरीशिवे सर्वार्थऽदे नित्यं शिवरूपे नमोऽस्तुते।नमस्ते सर्वरूपिण्यै जगद्धात्र्यै नमो नम:संसारभयसन्यस्तां पाहि मां सिंहवाहिनी।
या मंत्रासह त्यांची प्रार्थना करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याचीदेखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वायनदान द्यावे. या दिवशी अग्नीशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रिने खाऊ नये असा विशेष नियम आहे. त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा. रात्री जागरण करावे, देवीची धुपारती करावी. कथा ऐकावी. दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचारी पूजा करून तिला खिचडीचा नैवेद्य दाखवावा. अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे.
या पूजाविधीत थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो. काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीचीही पूजा केली जाते. हिमालयकन्या पार्वती हिने तिला आवडलेल्या शिवशंकराशीच आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रीतिविवाह निर्विघ्नपणे पार पडला, अशी त्या व्रतामागची कथा आहे.