पार्थिव मूर्तीच्या विसर्जनाबाबतीत महत्त्वाचा शास्त्रसंकेत म्हणजे पार्थिव मूर्तीमधील प्राणप्रतिष्ठोत्तर आलेले देवत्व हे त्या दिवसापुरतेच असते. म्हणूनच कोणत्याही देवाची पार्थिवपूजा केल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होणे इष्ट असते. तथापि गणेशचतुर्थीच्या बाबतीत विविध कारणास्तव मूर्तीविसर्जन लांबणीवर टाकले जाते. त्यामध्ये एकतर सहाव्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीविसर्जन असल्यामुळे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन केले जाते. अशीच प्रथा बहुतेक ठिकाणी असून ज्यांच्या घरी गौरीव्रत आहे त्यांच्याबाबतीत ही प्रथा समर्थनीय ठरते.
दुसरे म्हणजे दहाव्या दिवशी अनंतचतुर्दशी असल्यामुळे त्यादिवशीदेखील काही ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन (Ganesh Visarjan 2023) केले जाते. गणेश चतुर्थी व अनंतचतुर्दशी ही पूर्णतया भिन्न देवतांची व्रते असल्यामुळे त्यांची एकमेकांशी सांगड घालता येत नाही. घरगुती गणेशव्रताच्या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक कार्याचे मन:पूर्वक आयोजन केलेले असल्यास दहाव्या दिवशी विसर्जन करणे समर्थनीय ठरेल.
पण एवढे दिवस गणपती ठेवणे काही कारणास्तव प्रशस्त ठरत नसेल, तर केवळ रूढीपोटी गणेशविसर्जन लांबणीवर टाकणे योग्य नाही. परंपरेने घरात गणेशोत्सव पाच, सहा किंवा दहा दिवसांचा करण्यास शास्त्राची कोणतीही हरकत नाही. याबाबत मनात संदेह बाळगू नये. मात्र गणपती विसर्जनाचे (Ganesh Visarjan 2023) नियम शास्त्रोक्त पद्धतीने पाळण्याबाबत प्रत्येकाने आग्रही असलेच पाहिजे.
शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजे तलाव, विहिरीत करू नये. अन्यथा त्या जलाशयातील तो जलाशय प्रदुषित तर होतेच पण त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाहण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी, पोळा, हरितालिका, पार्थिवशिवपूजा, जन्माष्टमी इ. व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात, घरातील बागेत किंवा तुळशीवृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते.