विरह वाईटच! मग तो व्यक्तीचा असो, नाहीतर बाप्पाचा! दरवर्षी बाप्पाचं असं असं पाठ दाखवून जाणं जिव्हारी लागतं! तो येताना भरपूर आनंद घेऊन येतो आणि जाताना भरपूर आशीर्वाद देऊन जातो, हे मान्य, पण त्याने गेलंच पाहिजे का? खरं तर हो! त्यामागील शास्त्र जाणून घेऊ. यंदा १७ सप्टेंबर रोजी भावपूर्ण अंत: करणाने बाप्पाला निरोप देऊन 'पुढल्या वर्षी लवकर या' असे सांगायचे आहे. या प्रथेमागचा हेतु समजून घेऊया.
'अतिपरिचयात अवज्ञा' असं सुभाषितकारांनी लिहिलंय. आपण काय, बाप्पाला कायमस्वरूपी जवळ ठेवून घेतलं असतं. पण तसं झालं तर प्रत्येक बाबतीत त्याला गृहीत धरलं जाईल. मागण्या मान्य झाल्या तर लाडी गोडी, नाही झाल्या तर रोषाचा धनी ठरवलं जाईल. आपली बकेट लिस्ट न संपणारी आहे. ती पूर्ण करण्यासाठी बाप्पाने आपल्याला सक्षमदेखील केलं आहे. तरी त्याने आपल्याला सोडून जावं असं वाटत नाही.
निरोप देताना येणारा गहिवर थांबवता येत नाही. जाणारा आपल्या गावी परत जाणार या आनंदात असतो, मात्र निरोप देणारा रिकामं घर, रिकामं मन आणि गत क्षणांमध्ये झुरत राहतो. बाप्पा जाताना आपलीही अवस्था अशीच होते. पण विरहाशिवाय मिलनाचा आनंद तरी कसा अनुभवणार? बाप्पाच्या आगमनासाठी आपण एवढे उत्सुक असतो की बाप्पा जाता जाताच पुढच्या वर्षी किती तारखेला येणार पाहून ठेवतो. तो येण्याच्या दीड दोन महिने आधीपासून गावचे तिकीट, मूर्तीची नोंदणी, उत्सवाच्या तयारीला उधाण येते. लोक जमतात, गप्पा, गोष्टी, नाच, गाणी, चेष्ठा, मस्करी करत गुण्या गोविंदाने नांदतात. आपापसातील मतभेद काळासाठी विसरून जातात. एकसुराने एक दिलाने बाप्पाची आरती म्हणतात, गजर करतात, मोदकाचा आस्वाद घेतात.
बाप्पा आपल्याकडे पाहुणचार घ्यायला येतो असे आपण म्हणतो, पण वास्तव पाहता आपल्याला रोजच्या कामाच्या धबडग्यातून चार क्षण आनंदाचे, उत्साहाचे, ऐक्याचे मिळवून देण्यासाठी तो येतो. हे परत परत अनुभवता यावे, म्हणून त्याला निरोप द्यायला हवा. त्याचा आदर्श ठेवून मंगलमूर्ती बनण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया. आणि त्याला सांगूया... हा विरह येत्या वर्षभरात संपेल, तू तेवढ्याच आनंदाने भेटीला येशील आणि तुझ्या स्वागतासाठी आम्ही पुन्हा सज्ज असू, याची खात्री आहे, म्हणून तात्पुरता निरोप देतोय...बुद्धिदाता तू आहेसच, फक्त तू दिलेली बुद्धी सत्कारणी लागावी एवढाच आशीर्वाद देऊन जा!