चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. मात्र, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. सन २०२२ मध्ये श्रीगणेश चतुर्थी कधी आहे? पुराणात याबाबत नेमके काय उल्लेख आढळतात? जाणून घ्या... (ganeshotsav 2022 date and time)
मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (ganesh chaturthi 2022 date and time)
श्रीगणेश चतुर्थी: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२
भाद्रपद चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३ वाजून ३२ मिनिटे.
भाद्रपद चतुर्थी समाप्ती: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३ वाजून २२ मिनिटे.
भारतीय पंचांगामध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. (significance of shree ganesh chaturthi)
भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
गणेशोत्सव आणि गणेश चतुर्थीचे व्रत
वास्तविक पाहता मुख्य गणेश चतुर्थीचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेशपूजा करावी, असे व्रत आहे. हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसल्यास किमान भाद्रपद चतुर्थीला पार्थिव पूजा करावी, असे शास्त्र सांगते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला.
चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी
महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिले.