२० मे, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी हा काळ आपण गंगादशहरा या नावाने संबोधतो. त्यासंबधी व्रत का केले जाते, सद्यस्थितीशी या व्रताचा काय संबंध आहे? गंगाकाठावर न जाताही आपल्याला गंगेची पूजा कशी करता येईल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून...
ज्येष्ठ मासातील महत्त्वाचे व्रत म्हणजे गंगादशहरा होय. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंतच्या दहा दिवसांना `गंगादशहरा' म्हणून संबोधले जाते. उत्तर भारतत या व्रताचे महात्म्य विशेष मानले जाते. ज्येष्ठ शुक्ल दशमीला स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतीर्ण झाली, अशी कथा आहे. या दिवशी जो गंगेमध्ये स्नान करेल आणि तिला दहा प्रकारची फुले , फळे अर्पण करेल त्याची दहा प्रकारची पापे नष्ट होतील, असे आशीर्वचन दिले गेले आहे.म्हणून गंगेला दश हरा म्हणजे दहा पापांचे हरण करणारी, असे म्हटले आहे.
ज्येष्ठाच्या पहिल्या दहा दिवशी रोज भाविकांकडून गंगेची पूजा केली जाते. जिथे गंगा नसेल तिथे गावात असेल ती नदी, तीही नसेल तर जो जलाशय उपलब्ध असेल तिथे हे उपचार, अर्पण करावयाचे असतात. रामसेतू बांधण्याचा प्रारंभ प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी केला, म्हणून या दिवशी सेतुबंध रामेश्वराची पूजा केली जाते.
ज्येष्ठ मास हा पावसाळ्यात येते. पावसाळा म्हणजे जलवर्षाव. जलदेवतेने आपल्यावर प्रसन्न व्हावे, पण ही प्रसन्नता `हवा तितुका पाडी पाऊस, देवा वेळोवेळी' अशा स्वरूपाची असावी. पाऊस कमी पडला किंवा अजिबात पडला नाही, तर अवर्षणाची, दुष्काळाची धास्ती निर्माण होते. अधिक पडला तर सगळे धुवून नेतो. अतिवृष्टीमुळे लोकांना घरादाराला पारखे व्हावे लागते. म्हणून जलदेवतेला संतुष्ठ राखण्यासाठी या व्रताची योजना असावी.
हा हेतू जाणून घेऊन या दिवशी पाण्याची पूजा जमेल तशी करावी. आता मुंबईसारख्या शहराजवळ तानसा, वैतरणा, मोडक सागर इ. जलाशय असले तरी तिथे जाऊन त्यांची पूजा करता येणार नाही. मात्र एखाद्या कलशात पाणी घेऊन त्याची पूजा करणे सहज शक्य आहे. आपल्याला जलदेवतेची पूजा करायची आहे, हा भाव मनात जागृत ठेवावा.
या गंगादशहराबाबत एक ध्यानात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे, की जेव्हा अधिक ज्येष्ठ मास असतो त्यावेळी गंगादशहरा हे व्रत अधिक मासात दिले जाते. अन्यथा इतर सर्व व्रते ही अधिक मासात न देता त्यानंतर येणाऱ्या निज मासातच देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. निसर्गाशी असलेले धर्मशास्त्राचे नाते घट्ट राहावे या भावनेने पावसाळ्यात येणारे हे व्रत यथाशक्ती पार पाडण्याचा प्रत्येकाने अवश्य प्रयत्न केला पाहिजे.