गंगा माता आपल्या सर्वांचे पाप धुवून टाकते, अशी श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीय आयुष्यात केव्हा न केव्हा गंगास्नान करतोच! एवढ्या जणांचे पाप धुवूनही गंगा मातेचे पावित्र्य किंचितही कमी झालेले नाही. म्हणून तर हजारो वर्षे झाली, तरी ज्येष्ठ मासातील पहिले दहा दिवस गंगा मातेला समर्पित करून तिचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची सांगता ३० मे रोजी होणार आहे. आपण यापूर्वी कधी गंगास्नान केले नसेल, तर शास्त्राने सांगितलेले उपाय करा आणि पावन व्हा.
अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा! गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।
हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.
याच बरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यात पुढील दहा पवित्र गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट मिसळून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. त्या दहा गोष्टी कोणत्या ते पाहू.
हिंदू संस्कृतीत गायीला गंगेइतकेच पवित्र मानले जाते. तसेच तिच्याकडून उपलब्ध होणारे गोमूत्र, गोमय, गोदूध, गोघृत म्हणजे गायीचे तूप अशा गोष्टींचा किंचित वापर आंघोळीच्या पाण्यात तसेच दैनंदिन वापरात केला असता त्याचे अनेक शारीरिक, मानसिक फायदे होतात, हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे. म्हणून पुढीलपैकी तुम्हाला कोणता पर्याय जमू शकतो, त्याचा अवश्य वापर करा.
१. गोमूत्र २. गोमय३. गोदूध ४. गायीच्या दुधापासून बनलेले दही५. गायीच्या दुधापासून बनलेले तूप ६. कढीलिंबाची पाने ७. भस्मलेपन८. लाल मातीचे लेपन९. मध १०. गरम पाण्याचे स्नान
हे साधे सोपे उपाय आणि गंगा मातेचे स्मरण करून स्नान करणे आपल्याला सहज जमू शकते. त्यामुळे गंगास्नानाची संधी दवडू नका आणि गंगा मातेचे आशीर्वाद पदरात पाडून घ्या.