>> योगेश काटे, नांदेड
आजपासुन गंगादशहरा उत्सवास सुरुवात होत आहे. हा उत्सव जेष्ठ शु.प्रतिपदा ते जेष्ठ शु.दशमी या कालावधीत साजरा होतो. या वर्षी हा उत्सव ७ ते १६ जून २०२४ या कालावधीत साजरा केला जाईल.
हिंदुजनमानसात श्रीगंगेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. सुसंस्कृत भारतीयांच्या अंतःकरणात श्रीगंगेविषयी नितांत आदर,श्रद्धा प्रेमआहे. या जगामध्ये जेवढी म्हणजे तीर्थक्षत्र आहेत ती सर्व श्रीगंगेचीच निरनिराळी रूपे आहेत अशी सज्जन, सहृदयी हिंदुंची धारणा आहे. कोणतेही पवित्रतेची उपमा श्रीगंगेच्या उल्लेखाशिवाय खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही. असे म्हणले तरी चालेल.
वामन अवतारात भगवान श्रीविष्णुंचे पाऊल स्वर्गात आले, तेंव्हा ब्रम्हदेवाने त्या पावलांची पुजा गंगामाईच्या जलाने केली. भगीरथाने खडतर तपश्चर्या करुन भगवान श्रीशंकराच्या सहाय्याने गंगेस पृथ्वीवर आपल्या पूर्वजांच्या उद्धराकरता आणली, असा आपला इतिहास सांगतो. अशा श्रेष्ठ व पवित्र गंगेची श्री जगन्नाथ पंडीत यांनी अत्यंत भावपूर्ण गंगामातेच्या भक्तिने प्रेमाने ओंथबलेल्या अंतकरणाने गंगलहरी च्या माध्यमातून स्तुती केली आहे. पण ही स्तुती देववाणी संस्कृतमधे आहे. पू.स्वामी वरदानंद भारती यांनी गंगलहरीचा खुपच छान असा ओवीबद्ध अनुवाद केला आहे. भाविकांनी तो आवश्य वाचावा.
प पू दासगणु परंपरेत श्री गंगादशहरा उत्सवास अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऋग्वेदातील नदीसुक्तात "इमं मे गंगे " असा उल्लेख सर्वप्रथम वाचावयास मिळतो. वृत्रासुर व इंद्र या दोघातील युद्ध हे अभ्यसकांना परिचित आहेच यांच्या मधील युद्ध अमृत व स्वगर्यी जलासाठी झाले इंद्राने वृत्रासुराचा पराभव केला व ते जल भुतलावर धावले ही या कथेची प्राथमिक माहिती आहे. पुढे विविध पुराणात या कथेचे विस्तार झाला आहे. तो उल्लेख पाहू.
वाल्मिकी रामायण
वाल्मिकी रामायणात अनेक प्रसंगात गंगेचा उल्लेख मिळतो तो महर्षी विश्वमित्राच्या यज्ञरक्षाणासाठी निघाले असता प्रभु श्रीराम व लक्ष्मण गंगाकिनारी थांबल्याचा उल्लेख मिळतो. तसेच वनवासात निघातान सीतामाईने गंगेची स्तुती करत प्रार्थना केली की आम्हाला वनवासातुन परत आणा. हा प्रसंग गंगातीर ओलांडून जाण्याचा आहे.
महाभारत
महाभारतात अनेक ठिकाणी गंगेचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहे. भीष्मजन्म ,गंगा शंतुन कथा प्रसिद्ध आहेच. त्याशिवाय द्रोणपर्वात गंगेचा उल्लेख मिळतो आणि युधिष्टिर भेटीला अभिमन्यू वीरगतीस प्राप्त झाल्यानंतर महर्षी व्यास सांत्वन करण्यासाठी येतात त्यावेळी वेदव्यास यांच्या मुखी गंगा व भगीरथाचा उल्लेख वाचावयास मिळतो. तसेच भगवदगीतेच्या विभुतियोगातही भगवान श्रीकृष्ण म्हणतात "मी सर्वश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा आहे " वनपर्वातही उल्लेख वाचायला मिळतो.
पुराणातील गंगेचा संदर्भ
पुराणात गंगाअवतरणाच्या अनेक कथा आल्या आहेत. मत्स्य व विष्णुपुराणातही आहे. ही दोन्ही पुराणे पुराणातील सर्वात प्राचीन मानली जातात असे अभ्यासकांचे मत आहे यातही गंगाअवतरणाच्या कथेचा भाग वाचावयास मिळतो. श्रीमद्भावतात गंगेच्या अवतरणाची कथा विस्तृत आली आहे. स्कंदपुराणातील काशीखंडात गंगेचे वर्णन आले आहे.
गंगास्त्रनाम स्तोत्र
स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात हे गंगासहस्त्रनाम स्तोत्र आहे. यात गंगेची हजार नामे आहेत. या गंगासहस्त्रनामाचे विशेष म्हणजे या नामांच्या रचनेचे वैशिष्ट्य असे की श्लोकातील सर्व नावे आद्य अक्षराने सुरु होते. यात बाराखडीतील प्रत्येक अक्षराचा उपयोग केला आहे.
पुराणानंतर चे साहित्य
साधारणतः महाकवी कलिदासाच्या साहित्यात गंगेचे काव्यमय वर्णन मिळते. तद्गनंतर आद्यशंकराचार्यांच्या साहित्यात मिळते जस की गंगाष्टक ही सुमधुर रचना भक्तीरसाने ओतप्रोत आहे.
संतसाहित्य
संतसाहित्यात ज्ञानेश्वरीत गंगास्तुती म्हणून जरी नसली तरी उपमा दृष्टांत म्हणून उल्लेख आहे व यात गंगेच्या वैशिष्ट्याबद्दल वर्णन आले आहे. श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतही गंगेचे वर्णन अनेक.ठिकाणी मिळेल. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची एक गंगेवरची एक रौद्ररूपी अशी 'गिरीचे मस्तकी गंगा' या नावाची रचना आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या विनयपत्रिकेत गंगेसंबंधीत काही रचना छान आहेत. जन्नाथपंडीतांची गंगालहरी प्रसिद्धच आहेत. वामन पंडीत यांनी गंगलहरीचा समश्लोकीत अनुवाद केला आहे. मोरपंतांची गंगास्तुती, गंगाविज्ञप्ती ,गंगाप्रार्थना हि गंगेवरची रचना प्रसिद्ध आहे.तसेच मोरपंतानंतर गंगालहरीचे ओवीबद्ध भाषांतर स्वामी वरदानंद भारती तसेच रामभाऊ पिंगळीकर श्री ओक, राधाबाई मराठे इ. सरस असा अनुवाद केला आहे. धर्मग्रंथात गंगादशहरा व्रत सुद्धा सांगितले आहे लेखविस्तार भयास्तव तेथे लिहीत नाही. तर असे गंगादशहराचे अर्थात गंगामातेचे अतुट असे हिंदुजनमानसातील महत्त्व सांगण्याच हा अल्प प्रयत्न.
आजपासून सुरु होणाऱ्या दशहरा महोत्सवाच्या सर्व हिंदुना शुभेच्छा.
गोदामाता की जय! गंगामाता की जय
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।