वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा जन्हूच्या कानातून बाहेर पडली, म्हणून हा दिवस गंगासप्तमी नावाने साजरा केला जातो. आज १४ मे रोजी गंगा सप्तमी आहे. ती कशी साजरी करावी आणि तिचे महत्त्व काय ते जाणून घेऊ.
त्यानिमित्ताने गंगेचे स्मरण व्हावे, हा त्यामागील शुद्ध भाव आहे. वास्तविक पाहता रोज स्नान करताना सप्तनद्यांचे स्मरण करावे, म्हणजे त्या नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य लाभते, नव्हे तर आंघोळ करत असलेल्या पाण्याला पवित्र नद्यांमधील पाण्याचे स्वरूप प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यासाठी आपले पूर्वज अंघोळ करताना पुढील श्लोक आवर्जून म्हणत असत.
गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||
असा सोपा श्लोक पाठ करून रोज म्हणावा आणि मुलांनाही शिकवावा. यातूनही कधी आपल्याकडून श्लोक म्हणायचा राहून गेला, तर त्याची आठवण व्हावी आणि पुनश्च सुरुवात व्हावी, म्हणून अशा तिथींचे आयोजन केले असावे. गंगासप्तमी ही तिथीदेखील त्यासाठीच आहे, असे समजून इथून पुढे आपल्या दिनचर्येत हा श्लोक अंतर्भूत करावा आणि पवित्र नद्यांचे नित्य स्मरण करून पुण्य पदरात पाडून घ्यावे.
आजच्या तिथीला जन्हूने गंगा पिऊन टाकली होती. परंतु राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून मोठ्या प्रयत्नाने गंगेला भूलोकी आणले होते. भगीरथाच्या विनंतीवरून जन्हूने आपल्या उजव्या कानातून तिला बाहेर काढले होते, म्हणून तिला जान्हवी असेही नाव प्राप्त झाले आणि ती भूलोकावर प्रगट झाली. भगीरथाच्या या महत्प्रयासांना पाहून तेव्हापासून भगीरथ प्रयत्न हा शब्द रूढ झाला आहे. त्या घटनेचे स्मरण म्हणून गंगा सप्तमी साजरी केली जाते. ही तिथी गंगेची जन्मतिथी मानली जाते.
आजच्या तिथीला गंगेची अथवा गंगेच्या मूर्तीची पूजा करायची असते. काही ठिकाणी आजच्या दिवशी गंगेच्या काठावर पितृतर्पणदेखील केले जाते. परंतु आपल्याजवळ गंगाकाठ नसेल किंवा गंगेची मूर्तीही नसेल, तर वर दिलेल्या श्लोकाचा पुनरुच्चार करून गंगेचे स्मरण करावे. आपल्या पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि गंगेप्रमाणे आपले चारित्र्य पवित्र राहावे, अशी गंगा मातेला मनोमन प्रार्थना करावी.