धर्म पुराणात चांगल्या आणि वाईट कर्मांचे तपशीलवार वर्णन केले आहे. यासोबतच कर्माच्या आधारावर स्वर्ग आणि नरकही सांगितले आहे. जे वाईट कर्म करतात त्यांना नरक मिळतो. त्याचप्रमाणे सत्कर्म करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्त होतो. तसेच सत्कर्माला सदाचरण आणि अध्यात्माची जोड जे देतात त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजेच मोक्ष मिळतो. गरुड पुराणात ही तिन्ही ठिकाणे सांगितली आहेत आणि त्यांच्यासाठी कर्मांचे वर्णनही केले आहे. नरकात जावे असे कोणालाही वाटणार नाही आणि मोक्षाचे द्वार सर्वसामान्यांनासाठी तसे अवघडच! म्हणून आपल्यासाठी निदान स्वर्गाचे द्वार उघडते का पाहू आणि त्यासाठी कोणते सत्कर्म पदरात लागते तेही जाणून घेऊ!
गरुड पुराणात मनुष्य जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. भगवान विष्णू आणि पक्षी राजा गरुड यांच्यातील चर्चेचा गरुड पुराणात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भगवान विष्णू सांगतात की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळते, त्यांना यमराज स्वत: स्वर्गाच्या दारात सोडण्यासाठी येतात. तेथे अप्सरा दारात त्यांचे स्वागत करतात. मृत्यूनंतर, असा आनंद फक्त त्या लोकांनाच मिळतो जे आपल्या आयुष्यात खूप चांगले कार्य करतात.
>> जे इतरांना जलदान करतात. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे यासारखे महापुण्य नाही. गरुड पुराणातही तेच म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, त्यांना स्वर्गात स्थान मिळते. जसे की विहिरी, तळी, हंडे भरून ठेवणे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे लोकही स्वर्गात जातात.
>> जे लोक नेहमी स्त्रियांचा आदर करतात आणि त्यांच्या उद्धारासाठी काम करतात, त्यांना स्वर्गातही स्थान मिळते.
>> जे आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि त्यातील काही भाग गरिबांच्या मदतीसाठी वापरतात, ते सुद्धा खूप पुण्यवान असतात. त्यांनाही स्वर्गात स्थान मिळते.
>> ऋषी-मुनींचा, साधू संत सज्जनांचा आदर करणारे लोक. ते त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सुविधांची व्यवस्था करतात, त्यांची सेवा करतात. वेद आणि पुराणांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना शिधा देतात, यथाशक्ती आर्थिक मदत करतात त्यांनाही स्वर्ग मिळतो.
>> जे आयुष्यभर चांगले कर्म करतात आणि कोणताही आजार न होता मरतात ते देखील स्वर्गास पात्र ठरतात.