मृत्यूपश्चात आत्म्याला गती कशी आणि कोणत्या दिशेने मिळेल या संबंधी गरुड पुराणात वर्णन केले आहे. हे वर्णन यासाठी कारण मनुष्याने ते वाचून आपल्या हयातीत अर्थात जिवंत असताना नीतिमूल्याला सोडून आचरण करून नये यासाठी ही आचारसंहिता! असाच एक नियम अन्न सेवनाबाबतीत दिला आहे.
'अन्न हे पूर्णब्रह्म' असे आपण म्हणतो, पण खरोखरच अन्नाची किंमत ठेवतो का? विशेषतः सण समारंभात लोक हौशीने ताटात सगळं काही वाढून घेतात आणि पोट भरलं म्हणून किंवा आवडलं नाही म्हणून निर्लज्जपणे फेकून देतात. जेवढी भूक तेवढेच वाढून घेता यावे यासाठी बुफेची व्यवस्था असते. मात्र तिथे सगळ्याच पदार्थांची चव घेता यावी म्हणून लोक ताटभर जेवण घेतात आणि सगळ्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत म्हणून फेकून देतात. अन्नाची नासाडी करणाऱ्यांबद्दल गरुड पुराणात कठोर शिक्षा दिल्या आहेत. ही शिक्षा देहाला नाही तर आत्म्याला भोगावी लागते आणि नरकातही जागा मिळत नाही असे म्हटले आहे. अन्नाला एवढे महत्त्व का दिले आहे? जाणून घ्या.
जर तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवले आणि पंधरा दिवस अन्न दिले नाही. तुमच्याकडून नाईलाजाने उपास झाला. तुम्ही देवाचा धावा केला आणि देव प्रगट झाला, तर तुम्ही देवाकडे सगळ्यात आधी काय मागाल? तर अन्न!
अशी उपासमार झाल्यावर अन्नाची खरी किंमत कळते. अन्न हे केवळ भोजन किंवा जिभेची रसनापूर्ती करणारे माध्यम नाही, तर ताटात वाढलेले अन्न हे जीवन समृद्ध करणारे घटक आहे. त्यामुळे अन्नाला सन्मानपूर्वक ग्रहण केले पाहिजे. अन्न शरीरात गेल्यावर रक्त आणि मांस बनते तेव्हा त्याची किंमत वाढते. ते तुमच्यासमोर येते तेव्हा त्याला आपल्या शरीराचा एक भाग समजा. श्रद्धापूर्वक त्याचे सेवन करा. ते वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
आजही गरिबीमुळे अनेकांची अन्नान्न दशा होते. अशा लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही दुर्लभ असते. अशा वेळी आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवताना सामाजिक भान जपले पाहिजे. जेवढे हवे तेवढेच अन्न वाढून घेतले पाहिजे. जी व्यक्ती अन्न टाकते तिला टोकले पाहिजे. लग्न समारंभ तसेच हॉटेलमध्ये जेवण टाकणाऱ्यांना आर्थिक शिक्षा दिली पाहिजे, त्याशिवाय अन्नाची, पाण्याची नासाडी थांबणार नाही.
जे सहज मिळते त्याची किंमत नसते, मग ते अन्न असो नाहीतर स्वातंत्र्य; यासाठी आचारसंहिता हवीच!