दुसऱ्यांच्या तुलनेत देवाने सगळी दुःखं माझ्या एकट्याच्याच पदरात का टाकली, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दुसऱ्याच्या लेखी आपण सुखी तर आपल्या लेखी तो सुखी आहे असे आपल्याला वाटत असते. वास्तवात प्रत्येकाच्या वाट्याला सुख आहे आणि दुखं आहे. सुखी तोच बनू शकतो जो दुःखावर मात करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून देवाने माझ्याच वाट्याला सगळी दुःखं का दिली, याचा विचार सोडा आहे आणि माझ्या वाट्याला आलेल्या समस्यांना मी सामोरा कसा जाऊ शकतो यादृष्टीने विचार आणि कृती सुरू करा, सांगताहेत प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!
कोणाच्या वाट्याला कशी परिस्थिती येऊ शकते यावर कोणीच भाष्य करू शकत नाही. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हा प्रत्येकाचा सरावाचा भाग असतो आणि त्यावर त्याचे सुख दुःखं अवलंबून असते. सामान्य लोक कठीण प्रसंगी भांबावून जातात, गोंधळतात तर असामान्य लोक कठीण प्रसंगातही शांत असतात. ते समस्येचा विचार न करता उकल शोधण्याचा विचार सुरू करतात.
असे असामान्य लोक जन्माला येत नाहीत. तर जन्मानंतर ते स्वतःची घडण अशी करतात की ते असामान्य पदाला जाऊन पोहोचतात. यासाठी ते प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा पर्याय निवडतात. याचे स्पष्टीकरण देताना गौर गोपाल दास सोड्याची बाटली आणि पाण्याची बाटली याचे उदाहरण देतात. सोड्याची सीलबंद बाटली वर खाली केली, तर झाकण उघडताच क्षणी त्यातून फेसाळ द्रव्य बाहेर येते. तेच पाण्याची सील बंद बाटली कितीही हलवली तरी त्याचे सील उघडल्यावर न फेसाळता ते शांतपणे बाहेर येते. आपण सगळे त्या सोड्याच्या बाटलीसारखे फसफसणारे आहोत. लोक आपल्याला राग देतात, उकसवतात, भांडायला फूस लावतात, अशा वेळी फसफसून बाहेर यायचं की शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता पाण्यासारखं थंड प्रवाही राहायचं यावर आपला सामान्यांकडून असामान्यत्त्वाचा प्रवास घडतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या उत्तम खेळीसाठी जाणला जातोच शिवाय त्याच्या शांत एकाग्र चित्तासाठी देखील त्याचे उदाहरण दिले जाते. साध्या क्रिकेट ग्राउंडवर किंवा अगदी गल्ली क्रिकेट खेळताना मुलं शिव्यांची लाखोली वाहतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळूनही सचिनने आजवर एकाही मॅच मध्ये अपशब्द काढला नाही, हे त्याचे असामान्यत्व आहे. ते आपण शिकले पाहिजे.
अनेकदा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, समोरची व्यक्ती मनाविरुद्ध वागते, अशा वेळी सोडा बॉटलसारखे फसफसून व्यक्त होऊ नका. त्यावेळी पाण्याची बाटली आठवा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवढं शांत राहाल तेवढ्या लवकर तुम्हाला परिस्थितीतून मार्ग सापडेल. हे जेव्हा सवयीने तुम्हाला जमू लागेल, तेव्हा तुम्ही आपणहून कुरकुरणे बंद कराल आणि देवाकडे आपल्यावर आलेल्या परिस्थितीची तक्रार न करता त्याच्याकडे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे बळ मागाल...!