>> योगेश काटे, नांदेड
आताचे तीन दिवस प्रत्येकाच्या घरी महालक्ष्मींचे आगमन जेवण व गाठी पडणे हा तीन उत्साह असतो. मराठवाडा व विदर्भ, खानदेश , नाशिक परीसरात महालक्ष्म्या म्हणतात तर प.महाराष्ट्रात गौरी म्हणतात. प्रत्येक भागातील पद्धती वेगळ्या स्वयंपाकाची कुलाचाराची पद्धत ही वेगळी. महालक्ष्म्या म्हणत असलो तरी मराठवाड्यातील विदर्भातील पद्धती वेगळ्या आहेत. प्रस्तुत लेखात खास करुन मराठवाड्यातील तेही नांदेड च्या आसपाच्या कुळाचाराची पद्वत सांगणार आहोत.
माझ्या निरीक्षणातूंन माझं वैयक्तिक मत सांगतो, मला असे वाटते, सर्वात मोठा सण म्हणजे महालक्ष्म्या तद्नंतर नवरात्र. तर महालक्ष्म्या म्हणलं मला आठवते मखर बसवणे पण त्याआधी ही मखर नसताना आम्ही पडते टाकून महालक्ष्म्या बसवत होतो. काही जणांकडे बसलेल्या, तर काहींकडे उभ्या लक्ष्म्या असतात. तर काहींकडे फक्त राशींचे पुजन रास म्हणजे गहु व तांदुळाची.
ज्यांच्याकडे बसलेल्या असतात त्यांच्या घरी मुलाचे लग्न झाल्यावर लक्ष्म्या उभ्या मांडतात. मुखवटे घेण्याची काही पद्धत आमाच्या मराठवाड्यात वेगळी असते. काही जणांकडे मुलीचे आई वडील मुखवटे घेऊन देतात तर काहींकडे तसे चालत नाही. चांगल्या संबंधितांकडून मुखवटे खरेदी करण्याचा प्रघात असतो. जो खर्च लागले तो संबंधितानी हळूहळू द्यायचा जमा झालेल्या लक्ष्मीच्या डब्यातून द्यावा लागतो. कोणाकडे पितळी तर कोणाकडे सुगड्याचे तर कोणाकडे प्लास्टर ऑफ पॉरीसचे मुखवटे असतात.
लक्ष्म्यांच पुजन मराठवाड्यात सहसा संध्याकाळीच होते आपवाद सोडला तर. महालक्ष्म्यांचा नैवद्य व फराळाची तयारी हा सर्वात मोठा भाग असतो. एक-दोन दिवसात सगळी तयारी करायाची असते. अनारसे साटोर्या पेटार्या, करंज्या रवा बेसनाचे लाडु, वेण्या, उंबर शेवलाडू मोदक, गुळपापडी चे लाडू (तांदुळाच्या पीठाची गुगळपाडी ) इ. पदार्थ . तर जेवणासाठी वा नैवेद्यावर पुरणपोळी सांज्याची पोळी, साखर भात, बासुंदी, श्रीखंड, खिचडी, बुंदीचा लाडू, मेतकूट, दही टाकून पंचामृत, कोशिंबीर, आमटी कटाची, कढी, चटणी, पातळ भाजी, फोडी भाजी, सोळ्या भाज्या , कढी पडवळ टाकून करतात.
पण वडे भज्जाशिवाय हे पूर्ण होत नाही. हा स्वयंपाक आरतीची तयारी म्हणजे तो धुपाचा सुवास भिमसेन कापूराने मन प्रसन्न करणारा वास. काडवातीने देवीला ओवाळने त्या आरतीच्या वातीपासून काजळ तयार करुन डोळ्यात भरणे, तसेच हळदी कुंकवाचे हुंडे त्याचाच सडा तसचे हतवे हे करताना कोण येतय? अस म्हणत सोन्या रुपाच्या पावलाने लक्ष्मी येते. सवाष्ण ब्राह्मण तसेच काही जणांकडे. सवाष्ण व ब्राह्मण काहीजणांकडे मुक्कामाला थांबण्याची पद्धत आहे.
दुसऱ्या दिवशी गाठी पाडणे हा मराठवाड्यातील खास प्रकार! काहीजणांकडे या दिवशी ही पुरण पोळी व सवाष्ण ब्राह्मण असते गाठी पाडणे हा महत्त्वाचा विधि. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या कथेत या पौत्याचे वा तातुचे फार महत्त्व सांगितले. स्त्री व पुरुष लाहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत घरातील प्रत्येक महत्त्वाच्या वस्तुस बांधणे कारण बरकत येण्यासाठी. उदा जातं, उखळ, पाटवरवंटा, खलबत्ता कपाट छोटी गिरणी. पौत हे आठ व सोळा पदरी व गाठीचे असते सोळाचे मोठ्यांना व आठचे लहानग्यांना व पुरुष मनगटावर बांधतात तर स्त्रिया गळ्यात परीधान करतात. तसेच या दिवशी हळदी कुंकवाचीही कार्यक्रम असतो. राशिसाठी वापरले धान्य हे नवरात्रात नऊ दिवस वापरतात तसेच पौतेही नवरात्रापर्यंत वापरतात, नंतर लक्ष्मीच्या निर्माल्यात विसर्जित करतात. पौत वर्षभर ठेवायचे व्रत कोणी आचरते.
सोळा भाज्यात कदुक, बीट, शेपु, गाजर या भाज्या निषिद्ध आहेत.तर कर्टुलं, तोंडल ,चमकोरा , आंबाडी या भाज्या महत्त्वाच्या आहेत आणि अंबिलही! या सगळ्यात पुरुषवर्गाचीही मदत असते, मात्र मुख्य कामाचा ताण महिला वर्गावर असतो. तरीसुद्धा ना कुठे थकवा, ना चिडचिड, सगळं प्रसन्न व हसत मुखाने करणारी गृहगौरी सुद्धा उत्साहात असते त्यामुळे मखरातली गौरीदेखील तृप्त होऊन जाते!