गौरी विसर्जन (Gauri Visarjan 2024) पूजा गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सुरू होते. यंदा गौरी विसर्जन मुहूर्त (Gauri Visarjan Muhurat 2024) १२ सप्टेंबर रोजी दुपारी १. ३१ ते रात्री ९.५१ मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत गौरी विसर्जन कसे करायचे आणि कोणकोणते नियम पाळायचे ते जाणून घेऊ.
>>घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. गौरीला प्रसन्न करण्यासाठी ती छान कपडे घालून विसर्जन पूजेला सुरुवात करावी. देवीची उत्तरपूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते.
>>उत्तरपूजेच्या वेळी गौरीला हळद, सिंदूर, चंदन, सुका मेवा, नारळ, सुपारी आणि फराळाचे पदार्थ, अगरबत्ती आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात.
>>बहुतेक घरांमध्ये देवीला हळद आणि कुंकू लावून विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि सौभाग्याच्या थाळीचे वाण ५ महिलांना दिले जाते. ही पाच ताटं पूजावेदीसमोर ठेवून पूजा केली जाते, मग दिली जाते.
>>पूजेनंतर या पाच थाळ्या पती आणि कुटुंबासोबत पाच निमंत्रित महिलांना दिल्या जातात. नैवेद्यरूपी एखादी मिठाई दिली जाते. त्यांना देवीचे रूप मानून पूजा केली जाते, त्यामुळे त्यादेखील दिलेल्या पूजेचा आणि दानाचा आनंदाने स्वीकार करतात.
>>गौरीची आरती केली जाते आणि देवीवर अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या पाहुणचाराचा समारोप दही भात देऊन केला जातो. सोबतच विडा दिला जातो. 'पुनरागमनायच' म्हणत देवीला पुढल्या वर्षी परत ये असे आमंत्रण दिले जाते.
>>काही ठिकाणी, गौरीला निरोप देणारी गाणी या समारंभात गायली जातात. तसेच आरतीचे विविध प्रकार म्हणून देवीची संगीत सेवा केली जाते. सेवी सोनपावलांनी येते तशी सुख, समृद्धी देऊन जाते म्हणून येताना जसे कुंकवाने देवीच्या पावलांचे ठसे काढले जातात, तसेच देवी जाताना तिला बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दारापर्यंत देवीची पावलं काढून देवीला निरोप देण्याचाही काही ठिकाणी प्रघात आहे.
>>गौरी मुखवट्याच्या अर्थात पंचधातूंच्या, सोन्या, चांदीच्या असतील तर, तसेच दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन केले जाते. जिथे मातीचे मुखवटे किंवा खड्याच्या गौरी असतात त्या वाहत्या जलाशयात विसर्जित केल्या जातात.
>>देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवली जाते आणि नंतर ती माती आशीर्वादरुपी घराच्या कानाकोपऱ्यात तसेच कपाटात, तिजोरीत ठेवली जाते.
>>अनेक ठिकाणी गौरी विसर्जन हे गणेश विसर्जन सोबत केले जाते.