मौन धारण करणे म्हणजे फक्त न बोलणे नाही, तर न बोलण्याच्या प्रक्रियेबरोबर विचारचक्र थांबवणे. आपण मौन धरतो, तेव्हा मनातल्या मनात जास्त बोलत असतो, परंतु जेव्हा साधू संत, ऋषी मुनी, तपस्वी मौन धरतात तेव्हा ते शून्य विचारांच्या पोकळीत प्रवेश करतात. तिलाच समाधी अवस्था असेही म्हणतात. परंतु आपण प्रापंचिक जीव या अवस्थेपर्यंत पोहोचणे कठीण, तरीदेखील काहीही न करता, मनात कोणतेही विचार न आणता दिवसभरातुन फक्त दहा मिनिटे मौन धारण करू शकलो तर त्याचे अगणित फायदे होतात.
आपल्याकडील प्रत्येक धामिर्क ग्रंथात मौनाचे महत्त्व दिले आहेच. स्नान, संध्या, जप, तप, देवपूजा, उपवास या वेळी मौन पाळावे, आनंदी राहावे. काही लोक तर आठवड्यातून एक दिवस मौन पाळतात. महात्मा गांधी आठवड्यातून एक दिवस मौन पाळत. त्या दिवशी त्यांच्याकडे येणाऱ्यांना ते कागदावर सांगणे लिहून देत.
बोलण्यामध्ये मनुष्याची फार शक्ति खर्च होते. अग्नितत्व आणि वायुतत्व, ही दोन तत्वं विशेष रुपाने बोलण्यात खर्च होतात. आता तासभर समजा कोणी बोलत असेल तर त्याच्या शरीरात उष्णता वाढते. जर तुम्ही दिवसाच्या १२ तासांपैकी, १६ तासांपैकी अनेक तास बोलतच राहिलात तर उष्णता वाढून तेवढी शक्ति उगाच खर्च होईल. कारण असलं म्हणजे तर बोलावंच लागतं परंतु निष्कारण आपण बोलत राहिलो, स्वतची बढाई मारण्यासाठी बोललो, काही निंदा करण्यासाठी बोललो तर आपल्या शरीराची उष्णता वाढते.
मौनाच्या अभ्यासाचं पहिलं पाऊल उचलायचं झालं तर- कारणावाचून बोलू नये. बोलायचं ते मोजकं असावं, नेमकं असावं. मनात काहीतरी एक असावं, शब्द काहीतरी वापरावे, हेतू आणखी काहीतरी तिसराच असावा, असं नसावं. मग ते बोलणं अराजक झालं पहा! अव्यवस्था झाली. म्हणून मौनाकडं जायचं असेल तर आधी वाणीमधील अव्यवस्था, अराजकता, अंदाधुंदी ही काढून टाकावी.
दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसांत बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात. काही परंपरा आध्यात्मिक आणि धार्मिक कारणास्तव तसेच, प्रार्थनेपूर्वी अथवा योगाभ्यासापूर्वी, तसेच विपश्यनेत मन शांत होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मौन पाळण्यासाठी मार्गदर्शन करतात.
एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे, मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे हे मौनाचे अनेक गुण व फायदे आहेत. म्हणून मौन पाळा आणि मौनाचे आणखीही अगणित फायदे अनुभवा.