>> ज्योत्स्ना गाडगीळ
गिरनार परिक्रमा हा अंतर्मुख करायला लावणारा अनुभव असतो. अनेकांनी त्याची अनुभूती घेतली आहे. त्याबद्दल बरेचदा ऐकलं वाचलंही होतं, पण प्रत्यक्ष जाण्याचा योग आला तो या वर्षी. त्यामुळे २०२३ या वर्षाने काय दिलं तर दत्तगुरूंची भेट आणि समृद्ध करणारा अनुभव दिला, त्याचेच शब्दांकन केले आहे.
'तुझी गिरनारला जायची इच्छा आहे म्हणालेलीस ना? २२ जणांचा ग्रुप जातोय, त्यात दोघांचं जाणं कॅन्सल झालंय, मी जातेय, दुसऱ्या तिकिटावर तुला यायचंय का? शुक्रवारी निघायचं आहे, येणार असशील तर लवकर कळव!' मागच्या बुधवारी ओळखीतल्या काकूंचा फोन आला. सुट्टीची जुळवाजुळव होतेय का पाहिली आणि गुरूमहाराजांचं बोलावणं आलं आहे समजून गुरुवारी होकार दिला आणि शुक्रवारी गिरनार प्रवासाला निघाले. गुरुशिखराचं दर्शन घेणं एवढीच इच्छा होती, पण दत्त महाराजांनी परिक्रमेचं पुण्यही पदरात घातलं. शिवाय त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर द्वारका, बेट द्वारका, सोमनाथ आणि नागेश्वर या तीर्थक्षेत्रीही दर्शनाचा लाभ मिळाला. अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता, तो महाराजांनी करवून घेतला!
गिरनार परिक्रमा : ३८ किलोमीटरचा पायी प्रवास! प्रचंड चढ-उतारांना सामोरं जात, शारीरिक-मानसिक क्षमतांची कस पाहणारा! जंगल, रात्रीचा प्रवास, हवेत गारठा वगैरे सुरुवातीला गुडी गुडी वाटतं, पण पावला पावलावर आव्हान वाढत जातं तेव्हा पोटात, पायात गोळा यायला लागतो. गर्दीत आपण मागे पडणार नाही ना, ही भीती, त्यात गर्द झाडी, श्वापदांची भीती, पाणवठ्याजवळ अचानक कानावर येणारी डरकाळी, मग भीतीपोटी मनात सुरू असलेला उच्चार एकजुटीने मोठ्याने सुरू होतो. 'जय गिरीनारी' म्हणत परिसर दुमदुमून जातो. पुढे बघायची उसंत मिळत नाही. कुठे जायचं, कस जायचं माहीत नसताना सगळे झपझप पावलं टाकत असतात. कधी वेग मंदावतो, तरी कधी अवसान गळून जातं. अशावेळी परिचित, अपरिचित प्रवासी धीर देतात, प्रोत्साहन देतात, थोडंच अंतर बाकी आहे सांगत मैलोनमैल प्रवास करायला लावतात. अंगातले त्राण संपले तरी परतीचे मार्ग बंद असल्याने फक्त पुढे जाणं प्राप्त होतं! अर्ध्यावर तरी पोहोचलो असू असं वाटत असताना आपण फक्त एक दशांश अंतर पार केल्याचं कळतं तेव्हा रडू येतं. तरी चालत राहायचं. न डगमगता. सगळ्यांना सोबत घेऊन. सगळ्यांच्या मागून, दत्तगुरूंना स्मरून! हेच करता पाहता १४ तासांत आमची गिरनार परिक्रमा पूर्ण झाली आणि एक विश्वविक्रम आपल्या नावावर झाल्याचा जणू आनंद झाला.
परिक्रमेतून शिकलेली गोष्ट म्हणजे, ही केवळ गिरनार प्रदक्षिणा नाही तर आपल्या आयुष्याचा परिघ आहे. यात असेच भयंकर चढ उतार येणार. मागे जाणं शक्य नाही, पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे फक्त दत्तनाम घेत चालत राहायचं. बाकीचे पुढे गेले म्हणून आपली गती सोडायची नाही. त्यांच्याशी तुलना करत थांबायचं नाही. छोटी छोटी पावलं टाकत प्रवास सुरु ठेवायचा, तो पूर्ण करून घ्यायची जबाबदारी भगवंतावर सोपवायची. एकमेकांना मदत करत ही परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करायची, हेच आयुष्याचं सार आहे, असं मला वाटतं.
त्याच दिवशी दुपारी तासभर झोप घेऊन सायंकाळी सोमनाथाचं दर्शन घेतलं. फोन तसेच इतर गॅझेट्स आत नेण्यास परवानगी नसल्याने सगळं गाडीत ठेवून देवाचं मस्त दर्शन घेतलं. सगळं दृष्य कॅमेऱ्यात न साठवता डोळ्यात साठवून घेतलं, तेही कायमस्वरूपी!
तिसऱ्या दिवशी बराच प्रवास करून नागेश्वर, बेट द्वारका आणि द्वारका पाहून आलो. तिचा इतिहास जाणून घेतला. श्रीकृष्णाचा वास असलेल्या भूमीवर आपण उभं आहोत या विचारानेही मोहरून आलं. छान दर्शन झालं आणि चार-पाच तासांचा प्रवास करत रात्री तीन वाजता जुनागडला परतलो.
अवघ्या तीन तासांची झोप पूर्ण करून गिरनार परिक्रमेला निघालो. रोप वे ने अर्ध अंतर पार झाल्याने गुरुशिखराचं दर्शन घडलं. तरी तिथे नेणारा प्रवास तसा अवघडच होता. मात्र परिक्रमेच्या वेळी चढ-उताराचा अनुभव पाठीशी असल्याने तोही पल्ला पार झाला आणि गुरूशिखरावर पोहोचलो आणि दत्तगुरूंचं मनमोहक दर्शन घडलं. महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांची संख्या सर्वाधिक होती. तसेच शंकर महाराज मठातले सेवेकरी परिसराची स्वच्छता मोहीम राबवत पाण्याच्या बाटल्या, कचरा गोळा करताना दिसले. अनेक भाविकांनीही त्याला हातभार लावला. अशातच आपणही कचरा न टाकून परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सांभाळणे हाही त्यांच्या कार्याला आणि पर्यावरणाला हातभार लावण्यासारखेच होईल. हे समाजभान बाळगत धुनीजवळ येऊन प्रसाद घेतला आणि परत देवीच्या मंदिरापर्यंत चढण करत रोपवेने ध्येय पूर्ण केलं. परिक्रमेच्या रात्री जे जंगल गूढ, अगम्य आणि भयावह वाटत होतं, तेच जंगल दिवसा रोपवे मधून पाहताना, ढगातून उताराकडे प्रवास करताना नयनरम्य वाटत होतं.
आठवडाभर एका वेगळ्याच जगात वावरत असल्याने इथल्या आभासी जगापासून दूर होते. पण समृद्ध करणाऱ्या अनुभवांचा पेटारा घेऊन परत आले, हाच तो परमानंद! जय गिरनारी!
माझ्या मते १५ ते ५५ वयोगटातील निरोगी लोक गुरुशिखर आरामात चढू उतरू शकतात. अर्ध्यावर नेणारा रोपवेचा तसेच डोलीचा पर्याय आहे. मात्र परिक्रमा काहीशी अवघड असल्याने प्रत्येकाने आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. बाकी दत्त गुरू पाठीशी आहेतच आणि कायम राहतील याची खात्री बाळगा!
जय गिरनारी!