- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
खरं तर; माणसाने देवाला इतकं सिमित करून ठेवलंय की, देव फक्त देवळातच असतो अशी बहुतांशी लोकांची धारणा आहे. भारतीय अध्यात्मशास्त्र तर कंठरवाने सांगते की -
कण कण में है भगवान..!
तो तर रानांत आहे, वनांत आहे, कोकिळेच्या गाण्यात आहे, सूर्याच्या किरणांत आहे, फुलणाऱ्या फुलात आहे, निष्पाप, निर्लेप मुलांत आहे, तो नाही अशी जागाच नाही, तो सर्वत्र व्याप्त आहे..! माणसाची मात्र तऱ्हाच न्यारी.. आज आपल्याला जिवंत माणसांत ईश्वर दिसत नाही आणि निर्जीवात ईश्वर शोधण्याचा आम्ही रात्रंदिवस अथक प्रयत्न करत असतो.
तिरुवन्नामलाईला रमण महर्षी या नावाचे एक दाक्षिणात्य संत होते. त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला होता. एकदिवस एक बुद्धिवादी इंग्रज मनुष्य रमण महर्षींकडे आला आणि म्हणाला, " तुम्ही स्वतःला साक्षात्कारी म्हणविता ना..? तुम्ही देव बघितला आहे कां..? जर तुम्हांला देव दिसला असेल तर तो मलाही दाखवा नाहीतर मी जगाला ओरडून सांगेन की - देवधर्म हे सर्व थोतांड आहे..! रमण महर्षी भोळ्याभाबड्या लोकांना फसवतात..! " डॉ. रमण महर्षी त्या बुद्धिवादी इंग्रज माणसाला म्हणाले, " ठीक आहे.. आपण उद्या सकाळी माझ्याकडे या..मी आपल्याला माझा देव दाखवतो..! " दुसरे दिवशी हा बुद्धिवादी इंग्रज रमण महर्षींकडे गेला. रमण महर्षी आणि हा इंग्रज दोघे घराबाहेर पडले. दोन तीन मैल चालत गेल्यावर त्यांना एक झोपडी लागली. त्या झोपडीत एक कुष्ठरोगी विकलांग अवस्थेत पडला होता. त्याच्या सर्वांगातून रक्तस्राव होत होता. त्याला त्या अवस्थेत बघताच डॉ. रमण महर्षी त्याच्याजवळ गेले. त्याचे कपडे काढून त्यांनी त्याच्या सर्वांगाला मालिश केले, त्याला स्नान घातले. रमण महर्षींनी आपल्या हाताने स्वयंपाक करून त्या कुष्ठरोग्याला पोटभर जेवू घातले. त्या असहाय्य असणाऱ्या, गलितगात्र कुष्ठरोग्याने रमण महर्षींचे पाय धरले आणि अश्रूंचा अभिषेक त्यांच्या पायावर केला. आता रमण महर्षी त्या बुद्धिवादी इंग्रज माणसाला म्हणाले, " भल्या माणसा.. हाच माझा देव आहे..! या माणसातच मला देवाचा साक्षात्कार झाला..! " आता मात्र तो बुद्धिवादी इंग्रज माणूस आश्चर्यचकित झाला, त्याने रमण महर्षींची क्षमा मागितली. आज आपण प्रत्यक्ष येशू ख्रिस्तालाच बघत आहोत असा भास त्याला क्षणभर झाला.
ज्याला जिवंत माणसात देव दिसत नाही, त्याला दगडात कसा दिसणार..? देवाला बघण्यासाठी अगतिकता यावी लागेल. अंतःकरण निर्लेप, निर्विकार, निर्विषय व्हावं लागेल. देव तर आपल्याला रोजच भेटतो. कधी आंधळ्याच्या रूपात, कधी पांगळ्याचा रूपात, दारात आलेल्या निराधार असहाय्य भिकाऱ्याच्या रूपात मात्र आपणाला माणसातला हा दारात आलेला देव दिसतच नाही. तो आपल्या दारात येतो आणि आपण त्याला पाहायला पंढरपूरला जातो. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगून ठेवतात -
देव आहे देव आहे । जवळी आम्हा अंतर्बाह्य ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )