आयुष्यात बऱ्याचदा अशी वेळ येते, जेव्हा 'कशासाठी जगतो आहोत आम्ही' असे विचार आपल्या मनात डोकावतात. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याअर्थी आपल्याला आजचा दिवस देवाने दाखवला आहे,त्यामागे नक्कीच त्याचे काही ना काही उद्दिष्ट आहे. जगण्याचे उद्दिष्ट, ध्येय कधी स्वतःला शोधावे लागते, तर कधी ते आपणहून सापडते. ते उद्दिष्ट सापडले, की जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. कसा ते पहा...
एका शहरात सुंदर बाग होती. बागेत नानाविध फुले होती. छोटे छोटे तलाव होते, कारंजी होती. ही सुंदर बाग पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत असत. त्या बागेत एक सुंदर गुलाबाचे रोपटे होते. त्या रोपाला बारमाही सुंदर व सुंगंधी गुलाब येत असत. लोक वाट वाकडी करून त्या गुलाबाच्या रोपट्याला वळसा घालून जात असत. त्या रोपट्याचे एक पान नेहमी नाराज असत. त्याला वाटे, सगळे जण इथे गुलाब पाहायला येतात. आपण असूनही कोणाला आपले कौतुक नाही. मग आपल्या अस्तित्त्वाचा नेमका फायदा तरी काय?
त्याचवेळेस सोसाट्याचा वारा सुटतो. दुःखी असणारे ते पान वाऱ्याबरोबर उडत तलावात येऊन पडते. ते पाण्यावर तरंगत असते. थोड्या वेळाने वातावरण शांत होते. त्यावेळेस पानाचे लक्ष तळ्याकाठी अडकलेल्या मुंगीकडे जाते. तिला वर जाता येत नव्हते आणि पाण्यात पडता येत नव्हते. पानाने मुंगीला विचारले, 'मी करू शकतो का?'मुंगी म्हणाली, 'पण तू तर पाण्यात आहेस, तू बुडणार नाहीस का?'पान म्हणाले, 'नाही, देवाने मला तरंगून जाण्याचे वरदान दिले आहे. मी तुला माझ्या पाठीवर बसवून तळ्याच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षित पोहोचवू शकतो.'
मुंगीने पानाची मदत घेतली. ती तळ्याच्या दुसऱ्या काठावर सुरक्षित पणे पोहोचली. उतरल्यावर तिने पानाचे आभार मानले व म्हणाली, 'तुझ्यामुळे माझे प्राण वाचले.'त्यावर पान म्हणाले, 'उलट मीच तुझे आभार मानले पाहिजेत, कारण तुझ्यामुळे मला मिळालेले वरदान कोणते याची मला जाणीव झाली आणि मी कोणाच्या उपयोगी पडू शकलो याचा आनंद झाला.'
अशा रीतीने एक ना एक दिवस आपणा सर्वाना स्वतःची किंमत आणि जगण्याचे उद्दिष्ट नक्की गवसेल. तोवर धैर्य सोडू नका आणि सत्कर्म करत आनंदाने जगत राहा.