जेव्हा दुसऱ्याला सुखात,आनंदात, ऐषो आरामात आपण पाहतो, तेव्हा कळत नकळत मनात दुसऱ्याबद्दल असूया निर्माण होते. त्यामुळे असमाधानी वृत्ती बनते. मन सतत उद्विग्न राहते आणि आजारांना आमंत्रण मिळते. सुख मिळाले, तरी ते पचवण्याची क्षमता सर्वांमध्ये समान नसते. म्हणून भगवंताने प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार सुख दुःखाचे वाटप केले आहे. ते जर केले नसते, तर काय झाले असते, हे या गोष्टीवरून लक्षात येईल.
आनंदनगर नावाचे एक राज्य होते. त्या राज्याच्या राजाचे नाव देखील आनंदसेन होते. राजा आनंदसेन अत्यंत दयाळू, शूर आणि न्यायी होता. राजाला आपली प्रजा आवडत असे आणि प्रजेलाही राजा अत्यंत प्रिय होता. राजा आनंदसेनाच्या शौर्यामुळे त्याला शत्रूचे भय नव्हते. आनंदनगर राज्यातील प्रत्येक शेतात भरपूर धान्य येई. नदीला तर बारमाही पाणी असे. आनंदनगरची प्रजाही मेहनती आणि समाधानी होती.
एके दिवशी राजा आनंदसेन जंगलात शिकारीला गेला. दूर जंगलात फिरता फिरता राजाला खूप तहान लागली. जवळपास कुठे पाणीही दिसत नव्हते. तहानेने घसा तर अगदी कोरडा पडला होता. इतरक्यात राजाला दूरवर एक झोपडी दिसली. निदान झोपडीत पाणी तरी मिळेल या आशेने राजा त्या झोपडीकडे निघाला. झोपडीजवळ येताच एका मोठ्या झाडाखाली एक साधू तप करत बसलेला दिसला. साधूजवळ जात असताना राजाला एक भयंकर दृष्य दिसले.
एक भला मोठा विषारी नाग फणा काढून साधूला चावण्याच्या तयारीत होता. राजाने तत्काळ आपली तलवार उपसली आणि नागाचे तुकडे केले. त्या आवाजाने साधुने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहत राहिला. राजाने घडलेली घटना साधूला सांगितली. साधू राजाला म्हणाला, `हे राजन, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू मागशील तो वर मी तुला देईन.'
राजा आनंदाने विनयाने म्हणाला, `तसे पाहिले तर देवाच्या दयेने माझ्या राज्यात आनंदी आनंद आहे. माझी प्रजाही सुखसमाधानात आहे. परंतु मी पाहतोय, माझ्या प्रजाजनांना खूप कष्ट करावे लागतात. तेव्हा तुम्ही असा वर द्या की कोणालाही श्रम करावे लागू नयेत.' साधू महाराज हसून तथास्तू म्हणाले.
त्या दिवसापासून आनंदनगर राज्यातील सर्व कामे आपोआप होऊ लागली. शेतात आपोआप धान्य उगवू लागले. कपडे, घर, जेवण इ. सर्व गोष्टी प्रजाजनांना बसल्या जागी मिळू लागल्या. याचा परिणाम असा झाला, की प्रजा आळशी झाली. देरे हरी पलंगावरी, असे आयते ताट बसल्या जागी मिळतेय, तर हातपाय कशाला हलवले पाहिजे? अशी प्रजेची स्थिती झाली.
राजा आनंदसेन राज्यात फिरून पाहू लागला. तर लोक आळशासारखे बसून आहेत. काही लोक नुसते झोप काढत आहेत. बरेच जण आजारी आहेत. हळूहळू रोगराई वाढू लागली. राजाने मोठमोठ्या वैद्यांना बोलावले, परंतु कसलाही उपाय झाला नाही. प्रजाजन धडाधड मृत्यूमुखी पडू लागले. हे सर्व पाहून राजा चिंतातूर झाला.
राजा आपल्या सिंहासनावर बसला होता. तेव्हा द्वारपालाने येऊन कोणी साधुपुरूष भेटीस आले आहेत असा निरोप दिला. राजाने दरबारात साधूपुरुषाला बसवले. आदरसत्कार केला आणि हकिकत सांगितली.
हे ऐकून साधू महाराज म्हणाले, `राजा, या सर्व रोगांवर एकच उपाय आहे. तो म्हणजे श्रम, मेहनत, जे देवाचे एक वरदान आहे. श्रमामुळे आलेल्या घामाने आपल्या शरीरातील सर्व रोग नाहीस होतात. म्हणूनच जेव्हा तुझी प्रजा श्रम करत होती, तेव्हा कोणी आजारी नव्हते. त्यांना आयते मिळणे बंद केले, तर ते पूर्ववत कार्यक्षम होतील.'
साधू महाराजांच्या बोलण्याने राजाचे आणि त्याच्या प्रजेचेही डोळे उघडले. सर्व प्रजा कामाला लागली, काबाडकष्ट करू लागली. श्रमाच्या घामाने त्यांचे सर्व रोग पळाले. प्रजा निरोगी झाली आणि आनंदाने राहू लागली.