आपल्याला न येणाऱ्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. तरीदेखील एखाद दुसऱ्या विषयात पारंगत होऊन आपण स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. परंतु, सगळ्यांना सगळ्याच गोष्टी करता आल्या असत्या तर कोणीही कोणाला किंमत दिलीच नसती. सर्वांनी मिळून मिसळून राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, याच उद्दिष्टाने देवाने प्रत्येकात काही ना काही उणीव ठेवली आहे. आता हीच गोष्ट पहा ना...
एक कावळा उडत उडत समुद्र तटावर जातो. तिथे एक हंसांचा समुह बसलेला असतो. कावळ्याला स्वत:ची बढाई मारण्याची लहर येते. तो त्यांच्या समुहात जातो आणि आपण किती माणसाळलेलो आहोत, किती लोकप्रिय आहोत याचे दाखले देऊ लागतो.
हंसामधला एक ज्येष्ठ हंस पुढे येऊन म्हणतो, `अरे वाह ही तर चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अभिमान बाळगू नकोस आणि दुसऱ्यांना कमी समजू नकोस. तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा.'
कावळ्याला चेव चढतो. तो हंसाशी पैज लावतो आणि आपली कर्तबगारी दाखवून त्याच्याशी तुलना करण्याचे आव्हान देतो. समुहातला एक तरुण हंस पुढे येतो. तो ते आव्हान स्वीकारतो. दोन टप्प्यांमध्ये स्पर्धा होणार असे ठरते. पहिल्या टप्प्यात हंसाने कावळ्याचे अनुकरण करायचे आणि दुसऱ्या टप्प्यात कावळ्याने हंसाचे अनुकरण करायचे, असे ठरले.
स्पर्धा सुरू झाली. कावळा खर्जात आवाज लावून तर कधी तार सप्तकात आवाज लावून काव काव करू लागला. इथून तिथे उडू लागला. या झाडावरून त्या झाडावर जाऊ लागला. हंसाने तसे सगळे करण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे जमले नाही. जिंकलो या आविर्भावात कावळा दुसऱ्या टप्प्याला सामोरा गेला. हंस काही न बोलता समुद्राच्या दिशेने उडू लागला. कावळा त्याच्या पाठोपाठ उडू लागला. पण नुसते उडण्यात कसली आलीये कर्तबगारी, या विचाराने कावळ्याने हंसाला हटकले. दोघेही समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचले होते. हंसाला रोजचा सराव होता, पण कावळ्याला एवढावेळ उडण्याची सवय नव्हती. तो दमला. टेकायला फांदीही नव्हती. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. कावळ्याचा अभिमान गळून पडला. त्याने हार मान्य केली. तेव्हा दमलेल्या कावळ्याला खांद्यावर बसवून हंस उडत उडत समुद्रकिनारी पोहोचला.
त्यावेळी स्पर्धेचा निकाल लावत ज्येष्ठ हंस म्हणाला, `देवाने प्रत्येकाला जसे काही ना काही वैशिष्ट्य दिले आहे. तशी प्रत्येकात काही न काही उणीव देखील ठेवली आहे. म्हणून जे आहे त्याचा अभिमान बाळगू नये आणि जे नाही त्याबद्दल रडत राहू नये. एकमेकांना मदत करावी आणि आनंदात जगावे.'