महत्त्वाच्या कामाला निघताना मनात शेकडो शंका कुशंका येतात. काम होईल का? संबंधित व्यक्ती भेटेल का? कामाला गती मिळेल का? कामात अडथळे येतील का? असे नानाविध प्रश्न उपस्थित राहिले, की मनात शंकेची पाल चुकचुकते. नुसत्या विचाराने आपण गर्भगळीत होतो आणि भीतीने कामाची चालढकल करत आजचे काम उद्यावर रेटतो. परंतु, वेळेला अतिशय महत्त्व असते. निघून गेलेली वेळ आणि हातातून निसटलेली संधी परत येत नसते. म्हणून आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करा आणि सोबतच पुढील उपाय करा. कामात अडचणी येणार नाहीत.
>>कामात अडथळे येण्यामागे अनेकदा कारणीभूत असते, ती म्हणजे ग्रहदशा. काम अधिकच महत्त्वाचे असेल, तर घराबाहेर निघण्याआधी पंचांगात किंवा दिनदर्शिकेत राहू काळ तपासून घ्यावा. राहू काळात कामासाठी बाहेर पडू नये. राहू काळ सुरू होण्याआधी किंवा झाल्यानंतर कामाची सुरुवात करावी. सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत राहू काळ असतो आणि तो साधारण दीड तासांचा असतो.
>>ज्या दिशेने प्रवास करणार आहात, ती दिशा प्रवासासाठी योग्य आहे की नाही, हे देखील दैनिक पंचांगात दिलेले असते. त्याला दिशाशूल म्हणतात. त्यावर उपायही दिलेले असतात. म्हणून पंचांग पाहण्याचा रोज सराव ठेवला पाहिजे आणि पंचांग कसे पाहावे हे शिकून घेतले पाहिजे.
>>एखाद्या कामाचा निकाल, खरेदी, बोलणी असे काही प्रसंग असतील, तर घराबाहेर निघताना एक चमचा दही साखर खाऊन निघा.
>>कामाला गती मिळावी, म्हणून घरातून निघताना पोळीचे तुकडे कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घालावे.
>>बाप्पाच्या नावाने सर्व प्रकारची कार्यसिद्धी होते. म्हणून बाप्पा मोरया म्हणून बाहेर पडावे. तसेच दाराबाहेर पडल्यावर ज्या बाजूला जायचे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने चार पावले मागे उलट चालावे.मग पुढे जावे.
>>पूर्वी घरी आलेल्या माणसाला गुळ पाणी देण्याची प्रथा होती. तसेच कामाला जाताना गुळ पाणी घेऊन निघावे.
>>महत्त्वाच्या कामालाच नाही, तर एरव्हीसुद्धा तुळशीचे पान खाऊन बाहेर पडणे शुभ मानले जाते.
>>आपल्या इष्ट देवतेची पूजा करून बाहेर पडावे.
>>तसेच स्वमुख पाहणेदेखील शुभ मानले जाते. स्वत:ला आरशात पाहून आपला आत्मविश्वास दुणावतो आणि कार्यपूर्तीचे बळ मिळते.
>>कामासाठी बाहेर पडल्यावर मागे फिरून पाहू नये. पुढेच मार्गक्रमणा करावी.