How And Who Can Use Rahu Gomed Ratna: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या माध्यमातून विविध पद्धतींनुसार एखाद्या व्यक्तीबाबतचा अंदाज, भविष्य कथन, घडामोडींचे भाकित केले जाऊ शकते. यापैकी एक म्हणजे रत्नशास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्याचे परिणाम, प्रभाव पाहिल्यानंतर काहींना एखादे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्नशास्त्रात काही रत्ने नवग्रहांसाठी विशेष तसेच प्रभावी मानली जातात.
रत्ने म्हणजे केवळ एक सौंदर्य वाढवण्यासाठीचा दागिना नसून, ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी रत्न धारण केले जाऊ शकते. रत्न शास्त्रामध्ये नऊ रत्ने आणि ८४ उपरत्नांचे वर्णन आढळून येते. पैकी ९ रत्ने नवग्रहांशी संबंधित मानली जातात. या रत्नांमध्ये असे एक रत्न आहे, ज्याचा संबंध नवग्रहातील क्रूर, मायावी राहु ग्रहाशी जोडला जातो. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात आणि कायम वक्री चलनाने गोचर करतात. कुंडलीत राहुचे स्थान आणि स्थिती याला अतिशय महत्त्व आहे. कुंडलीत राहु कमकुवत असेल किंवा अशुभ स्थानी असेल, तर हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ते रत्न म्हणजे गोमेद.
कोणत्या राशींचे लोक गोमेद धारण करू शकतात?
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर आणि कुंभ राशीचे लोक गोमेद रत्न धारण करू शकतात, असे म्हटले जाते. कारण मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनिदेव आहे. राहु ग्रहाचे शनिदेवाशी मित्रत्वाचे भाव मानले गेले आहेत. कुंडलीत राहु उच्चीचा असेल तर तुम्ही गोमेद धारण करू शकता किंवा राहुची महादशा सुरू असेल, तर गोमेद धारण करू शकता. कुंडलीत राहु सहाव्या आणि आठव्या स्थानी असेल, तरीही गोमेद धारण करू शकता. गोमेदसोबत मोतीसह अन्य रत्ने धारण करण्यास मनाई आहे.
गोमेद रत्न धारण केल्याने मिळतात अनेकविध लाभच लाभ
गोमेद रत्न धारण केल्याने व्यक्तीला अज्ञात भीतीपासून मुक्तता मिळू शकते. राजकारणात सक्रिय असलेले लोक गोमेद घालू शकतात. गोमेद घातल्याने शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदे मिळू शकतात. गोमेद रत्न शत्रूंवर विजय मिळण्यासाठी, मुलांमधील बंधने दूर करण्यास, काही आजारांपासून मुक्त होण्यास आणि कोणत्याही प्रकारची नशा किंवा व्यसनापासून मुक्त होण्यास प्रभावी ठरू शकते, असे सांगितले जाते.
गोमेद रत्न कसे धारण करावे?
अनुभवी ज्योतिषांच्या योग्य सल्ल्यानुसार, गोमेद बाजारातून विकत घ्यावे. गोमेद रत्न कुंडलीनुसार पंचधातु किंवा चांदीच्या अंगठीत शनिवारी किंवा बुधवारी किंवा ज्या दिवशी राहुचे नक्षत्र आर्द्रा, स्वाती, शतभिषा येते, त्या दिवशी धारण करावे. हे रत्न धारण करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यावी. त्यानंतरच नियम, पूजन आणि मंत्रजपासह रत्न धारण करावे. मंत्रवलेले रत्न अधिक प्रभावी ठरत. यानंतर राहु ग्रहाशी संबंधित वस्तू, गोष्टींची दान अवश्यक करावे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.