चांगल बोलण्याने दूरचे जवळ येतात. याउलट कठोर आणि वाईट बोलण्याने जवळचे दूर जातात. आपल्या वाणीमुळेही इतरांना शांती मिळते. एखाद्याची आस्थेने विचारपूस केल्याने त्याला आपल्या विषयी प्रेम आणि आपुलकी वाढत जाते. मनुष्याच्या जीवनात बालपणापासूनच चांगले वागणे आणि चांगले बोलण्याचे संस्कार केले जातात. अर्थातच चांगल्या संसारासाठीच अनादी काळापासून गुरूकुल, शाळा, महाविद्यालय आणि विश्वविद्यालयांची स्थापना झाली. कठोर बोलण्यासाठी तसेच वाईट वागण्यासाठी उपरोक्त गोष्टींपैकी एकाही गोष्टीची निर्मिती नाही. यावरूनच चांगले वागणे आणि बोलण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. अध्यात्मिक दृष्टीकोनातून खोलवर अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, वाणी ही एक तपश्चर्याच आहे. समाजात मृदू आणि मधूर बोलण्यानं दूरचे जवळ येतात. याउलट कठोर शब्द बोलण्यानं जवळचेही दूर जातात. म्हणूनच मनुष्याने आपल्या वाणीनेही कुणालाही दुखविता कामा नये. मधुर शब्द मृत्यूपरांतही कायम राहतात. मनुष्याच्या जीवनात चांगले अनुभव येतात. त्यावेळी तो आनंदी होतो आणि सुखावतो देखील. पण, एखादा जरी वाईट अनुभव आला की, माणूस लगेच दु:खी होतो. प्रत्येकाला जीवनात एक नव्हे तर अनेक कटू अनुभव येतात. कुणी अपमान करतो. अपशब्द वापरतो. त्यावेळी मनुष्याला वाईट वाटते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याने आपल्याशी वाईट वागणाºयाला अपशब्द, कठोर बोलू नये. आपला अपमान, तिरस्कार आणि वाईट करणाराचाही सन्मान करावा. जीवनातील सर्वच वाईट अनुभव स्वाहा करीत, समाजाच्या कल्याणासाठी सत्य बोलून, प्रिय, युक्त आणि सह्य बोलून आपली वाणी तपोपूत करावी. कारण सत्य बोलणं, प्रियं बोलणं, युक्त बोलणं आणि सह्य बोलणं ही चारप्रकारची वाणीची तपश्चर्या आहे. जीवनात चार प्रकारची तपश्चर्या केली तर कुणाचीही वाणी तपोपूत होते. सकारात्मक दृष्टीकोनाचा अंगिकार करून ज्ञानाची प्राप्ती केली तर मनुष्याच्या जीवनात ज्ञानाचा समुद्र होतो आणि तपश्चर्येचे शिखर होते.
‘नम्र स्वभाव आणि गोड वाणी सर्व प्रकारच्या यशाला हातभार लागतो, म्हणून माणसाने नेहमी गोड वाणी केली पाहिजे. मनुष्याने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहीजे की, ‘आवाजात इतकी शक्ती आहे की, कडू बोलणारा मध सुध्दा विकू शकत नाही आणि गोड बोलणाराची मिर्ची सुध्दा विकली जाते. ‘खरं तर गोड बोलणं हे केवळ स्वत:लाच नव्हे तर इतरांच्या कानांनाही दिलासा दायक आहे. संतांनी खरं सांगितलं आहे, दुसºयाचे तोंड गोड करण्यासाठी कुणालाही मिठाई खाण्याची आवश्यकता नाही. अथवा मिठाई वाटण्याचीही आवश्यकता नाही. तर गोड बोलून तुम्ही लोकांचे तोंड गोड करू शकता! वेद आणि शास्त्रांतही वाणी संयमाला सर्वोत्तम तपश्चर्या मानले गेले आहे. ऋग्वेदानुसार ‘या ते जिव्हा मधुमति सुमेधाने देवेषूच्यूत उरूचि’ तर नीतिमत्ता म्हणते, ‘खोटं बोलणं, असमान शब्द बोलणं, अहंकारी शब्द बोलणं, निंदा करणं इत्यादी गोष्टी आहेत. ज्यामुळे माणूस पाय-यांवर संकटग्रस्त होतो. म्हणून एक एक शब्द विचारपूर्वक बोलला पाहिजे.वाणीचे महत्व अधोरेखीत करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात की,‘तुलसी मीठे वचन तै, सुख उपजत चहुं ओर।वशीकरण के मंत्र हैं, तज दे वचन कठोर।’तर संत कबिरांनी अतिशय समर्पक शब्दातून वाणीचे महत्व रेखाटले आहे.
ऐसी बानी बोलिए, मन का आपा खोय।औरन को शीतल करै, आपहु शीतल होय।लक्षात ठेवा तलवारीची जखम उशीरा भरली जाते, पण कडवट वाणीने झालेली जखम कधीच भरून येत नाही. त्यामुळे नेहमी ‘मधुर आणि सह्य बोला’ स्वत: आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा!
- अनिल तुळशीराम गवईखामगाव.