एक जहाज एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासाला निघाले होते. त्या जहाजात हजारो प्रवासी होते. त्यात एक अतिशय श्रीमंत व्यापारीदेखील होता. जहाज समुद्राच्या मध्यभागी आले आणि एका मोठ्या वादळात सापडले. त्याचवेळेस अचानक इंजिनने काम करणे बंद केले.
जहाजातले सगळे अभियंते गोळा झाले आणि समस्येवर तोडगा शोधू लागले. आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. मध्य सागरात जहाज हिंदकळत होते. हा हा म्हणता म्हणता ही बाब सर्वत्र पसरली आणि सगळ्या प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली. त्यावेळेस घाबरलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याने जाहीर केले, जो कोणी हे जहाज आणि पर्यायाने सर्व प्रवाशांचा जीव वाचवेल त्याला मी बक्षीस देईन.
परंतु जहाजाचे इंजिन दुरुस्त करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हते. सगळ्या अभियंत्यांनी हात टेकले. त्यावेळेस एक मुलगा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एकदा माझ्या आजोबांना प्रयत्न करू द्या.' असे म्हणत तो आजोबांना घेऊन तिथे आला. आजोबा निवृत्त तांत्रिक अभियंता होते. तरुण अभियंत्यांनी आजोबांची टिंगल केली. जे आम्हाला जमले नाही, ते आजोबांना कुठून जमणार आहे, अशा आविर्भावात ते कुत्सितपणे हसत होते.
आजोबांनी मशीनची नीट पाहणी केली आणि बाजूला पडलेला हातोडा इंजिनावर जोरात मारला आणि घुर्घुर आवाज करत इंजिन सुरु झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आजोबांचे अभिनंदन केले. श्रीमंत व्यापाऱ्याने खुश होऊन आजोबांना एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ते पैसे एका हातात घेत आजोबांनी दुसरा हात पुढे करत म्हटले, बाकीचे एकोणीस हजार रुपये सुद्धा द्या!'
त्यावर व्यापारी म्हणाला, 'एक हातोडा मारण्याचे वीस हजार रुपये?'आजोबा म्हणाले, 'एक हजार रुपये हातोडा मारण्याचे आणि एकोणीस हजार रुपये योग्य जागी मारण्याचे!'
तात्पर्य हेच, की दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात. असे आजोबा तुम्हालाही भेटले तर त्यांची टिंगल न करता त्यांच्या ज्ञानाचा जरूर वापर करा.