>> डॉ. भूषण फडके सहस्त्रो वर्षांचा कालावधी उलटून गेला पण श्रीरामायण आजही आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकींकडून रामायणाची रचना होते आणि 'मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या' मंगल चारित्र्याचा अमृतकलश आपल्या हातात येतो. त्यातील अमृताचे रसपान करत आपण सुखावतो, कधी हळहळतो, तर कधी त्वेषाने पेटून उठतो आणि नतमस्तकही होतो, हीच या काव्याची उपलब्धी आहे.
रामायणाचा नायक श्रीराम 'मर्यादापुरुषोत्तम', रामायणाचे रचयिते 'महर्षी वाल्मिकी' 'आदिकवी' श्रीरामांचा सेवक श्री हनुमंत 'बुद्धिमतांमवरिष्ठम. श्रीरामांचा बंधू 'लक्ष्मण' हा आदर्श बंधू, भरत – त्यागमूर्ती, 'रामाची सीता – आदर्श पत्नी', रामाचे राज्य म्हणजे 'रामराज्य'.
भारताच्या दशदिशा श्रीरामकथेच्या अमृतकुंभातील आदर्शाच्या अमृताचा आस्वाद घेत याच अमृतरसाला 'रामरस' म्हणत त्याच्या वर्षावात तृप्ततेचा अनुभव घेत असतात. आपल्याला रामकथा माहीत असूनही ती पुन्हा पुन्हा वाचण्याचा, ऐकण्याचा मोह आपण आवरू शकत नाही हीच या कथेची आणि वाल्मिकींच्या प्रतिभेची महती आहे.
प्रभू रामाचे चरित्र आदर्शाच्या हिमालयावर आणि त्यागाच्या मेरूपर्वतावर उभे आहे. या चरित्राची व्याप्ती क्षितिजासारखी अमर्याद आहे. कवी किंवा लेखक जेव्हा श्रीरामचरित्रावर लिहितो तेंव्हा सरस्वतीही त्याच्यावर प्रसन्न होऊन सहाय्य करते असा अनुभव आहे. एखाद्या गोष्टीत तथ्य नसल्यास आपण या गोष्टीत 'राम' नाही असे म्हणतो म्हणजे तथ्य असल्यास 'राम' आहे हे निर्विवाद. दोन व्यक्ती आपापसात भेटतात तेंव्हा 'राम-राम' म्हणतात. अशाप्रकारे प्रभू रामांनी आपले जीवनच व्यापले आहे. वाल्मिकी ऋषीचे वाल्मिकी रामायण, त्यानंतर महर्षी वशिष्ठांचे योगवशिष्ठ, महर्षी व्यासांचे अध्यात्म रामायण, संत तुलसीदासांचे तुलसी रामायण, संत एकनाथांचे भावार्थ रामायण असे अनेकांनी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये रामायण लिहिले. कवी मोरोपंतांनी तर १०८ रामायणे लिहिली. समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरू तुकाराम महाराज यांनीसुद्धा प्रभूरामांवर अनेक अभंगरचना केल्यात. अगदी अलीकडच्या काळातील ग. दि. माडगुळकरांचे 'गीत रामायण' आणि त्याला मिळालेला लोकाश्रय सर्वश्रुत आहे. भक्तीमार्गाहून मुक्तीमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे, असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक ऐक्य एकोपा कसा वृद्धिंगत करावे हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. रामायण डोळसपणे अभ्यासून त्याची शिकवण अंगी रुजविल्यास राष्ट्रनिर्मितीस उपयुक्त ठरेल आणि संस्कारक्षम पिढीही निर्माण होईल. रामायणातील प्रसंगामधून जीवनोपयोगी तत्वज्ञान सांगितले आहे. या तत्वज्ञानातील योग्य शिकवण आपण समजून घेतल्यास रामायण जीवनोपयोगी होईल.
महर्षी वाल्मिकींनी ५०० सर्ग २४ हजार श्लोक आणि सात कांडांमध्ये रामायण विभागले आहे.. या काव्याची गोडी अमृतापेक्षाही अवीट आहे. प्रभू रामचंद्रांना आणि तुमच्यात असणाऱ्या परमेश्वराला अभिवादन करून वाल्मिकी रामायणाच्या या कथायज्ञाला प्रारंभ करूया. आजपासून रोज वाल्मिकी रामायणातील कथाभाग आणि त्यातून आपण काय शिकावे असे आपल्यासमोर दहा भागातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
बोला “सियावर रामचंद्र की जय !!!”
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९Email-bmphadke@gmail.com