बुधवारी २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा. अर्थात हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो. ती कशी उभारावी, कशी पुजावी आणि कधी उतरवावी, तसेच गुढी पाडव्याला काय काय करावे, याबाबत शास्त्र काय सांगते, ते जाणून घेऊया.
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचे तुम्ही वाचलेच आहे. या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरूषांनी पहाटे उठून स्नान करावे. तत्पूर्वी घर स्वच्छ करावे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. वडिलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी. आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून, ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक पुâलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू, लोटी किंवा फुलपात्र अडकवावे.नंतर सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुढी उभारावी. धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे.
नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी. पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने वाटून त्यात मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडे थोडे द्यावे. कडुलिंब खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते. नंतर गावातील राममंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे सर्व कुटुंबीयांनी मनोभावे दर्शन घ्यावे. परंतु, सद्यपरिस्थितीत मंदिरात प्रवेश नसल्यास घरातील रामरायाच्या प्रतिमेला नमस्कार करावा आणि हार घालून पूजन करावे. गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते. ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते. राम नवमीला ही नवरात्र संपते.
आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे. त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे. दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचे भोजन करून दिवस आनंदात घालवावा म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल. सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद-कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. नंतर गुढी उतरवावी.
आपण सर्व हिंदू बांधव चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो. म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सर्व आप्तजनांना नवीन वर्ष सुख, समृद्धी, आनंद व आरोग्याचे, भरभराटीचे जावो अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे.