जगात सर्व ठिकाणी स्वस्तिक चिन्ह निरनिराळ्या रुपात स्वीकारले गेले आहे. स्वस्तिक हे चिन्ह भारतीयांनी जगाला दिले. हे मंगल चिन्ह मानतात. चिरंतन सत्य, शाश्वत शांति व अनंत ऐश्वर्याचे, दिव्य सौंदर्याचे निदर्शक समजतात. जगातले सर्वप्रथम साहित्य वेद होत. त्यात स्वस्तिकाचा उल्लेख आहे. हे स्वस्तिक चिन्ह आर्यांचे आदि मांगलिक चिन्ह आहे. या मंगल चिन्हाने गुढी पाडव्याला दारावर स्वस्तिक रेखाटून नवीन वर्षाची मंगलमयि सुरुवात करा.
हठयोगातही एक स्वस्तिक नावाचे आसन असते. अलीकडेच समाजमाध्यमावर एका लहान मुलाने स्वस्तिकासन केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. ते आसन अतिशय अवघड असते. परंतु, शारीरिकदृष्ट्या त्याचे अनेक फायदे आहेत. लवचिक शरीर आणि उत्तम योगाभ्यास असणाऱ्यांनाच ते आसन जमू शकते.
मंत्रसिद्धीसाठी असणारी यंत्रे आहेत, त्यात स्वस्तिक यंत्र आहे. हस्त सामुद्रिक शास्त्रात हातापायावर स्वस्तिक चिन्ह असणे हे मंगलमय, ऐश्वर्यदर्शक मानतात. कोणत्याही मंगलकार्यात गणेशपूजा असते, त्याही आधी शुभदर्शक म्हणून स्वस्तिक चिन्हाने ते स्थळ सुशोभित करतात. जलकलशावर स्वस्तिक रेखाटतात. हे चिन्हच कलात्मवाचक आहे. केवळ वैदिकांनीच नव्हे, तर पारशी, बौद्ध, जैन इत्यादि अन्य धर्मांनीही स्वस्तिक चिन्ह स्वीकारून ते आपल्या मंदिरात, धर्मग्रंथात, वास्तूंत, नाण्यांवर, वस्तूच्या नावासाठी वापरले आहे.
धर्मशास्त्राच्या अभ्यासक सुधा धामणकर, जगभरातील स्वस्तिकाच्या वापराबद्दल विस्तृत माहिती देतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील आदिवासी माबरी जमातीचे लोक स्वस्तिक हे शुभ प्रतीक मानतात. जपानी लोक या चिन्हाला `मनजी' म्हणतात. कोरिया देशात पालख्या, छत्रचामरे इ. गोष्टींवर स्वस्तिक काढतात. चिनी माणसे हे चिन्ह तर कल्याणाचे प्रतीक समजतातच. पण दीर्घायुष्य, तेज प्रकाश, सूर्य यांचे प्रतीक मानतात. तिबेटी लोक आपल्या हातावर स्वस्तिक गोंदून घेतात. अल्जेरिया, इजिप्त, युरोप, स्कॉटलंड, आदि देशात स्वस्तिकाचा उपयोग होत आला आहे.
स्वस्तिक शब्दाचा अर्थ:
सु+अस्ति म्हणजे चांगले, कल्याणमय, मंगल आणि अस् म्हणजे सत्ता, अस्तित्व. स्वस्ति म्हणजे कल्याणाची सत्ता, मांगल्याचे अस्तित्त्व आणि त्यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे.
स्वस्तिकाच्या चिन्हात अनेक गूढ परिभाषा दडलेल्या आहेत, असे म्हणतात. गणपतीच्या `गं' या बीजाक्षरातही स्वस्तिक आहे. प्राचीन तसेच अर्वाचीन मान्यतेनुसार सूर्यमंडलाच्या चहू बाजूला विस्तारलेले विद्युत केंद्र स्वस्तिक स्वरूप आहे. वाल्मिकी रामायणातही स्वस्तिकाचा उल्लेख आहे. त्यातील उल्लेखानुसार नागाच्या फण्यावरस्थित नीळी रेघदेखील स्वस्तिकाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक हे नादब्रम्हाचे स्वरूप आहे. वैज्ञानिक परिभाषेनुसार स्वस्तिक अग्नी, जल, वायु, तेज यांनी युक्त असल्यामुळे त्याला `गतीशील सौर' म्हटले जाते.
स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी, तसेच गृह प्रवेशाच्यावेळी एक मंत्र म्हटला जातो,
स्वस्ति न: इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न पूषा विश्ववेदा:।स्वस्ति नस्तारक्ष्र्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।
महान कीर्तीवान इंद्र आमचे कल्याण करो. विश्वाचा ज्ञानस्वरूप पूषादेव आमचे कल्याण साधो. ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो.
आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगदोद्धाराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमयी स्वरूप `स्वस्तिक' आपणही आपल्या दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया.