>> यशदा क्षीरसागर
आर्थिक चणचण दूर होण्यासाठी जे अनेक प्रभावी उपाय आहेत त्यांपैकी एक म्हणजे श्री गुरुचरित्र अध्याय १८ वाचन! ज्यांना सतत आर्थिक नुकसान होते किंवा पैशांचा तुटवडा जाणवतो, पैसा टिकत नाही, आय कमी आणि व्यय जास्त होतो अशांनी या अध्यायाचे नित्य वाचन केले असता जुन्या क्लिष्ट कर्मांची दुरुस्ती होते आणि लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते.
दत्त महाराजांची सेवा करताना काही नियम कटाक्षाने पाळले तर त्वरित फायदा होतो. स्त्रियांनी वाचला तरी चालणार आहे. मांसाहार वर्ज्य करा. शुचिर्भूत असणे आवश्यक. लांडी लबाडी नको. वाचन करताना गाईच्या तुपाचा दिवा समोर असणे आवश्यक आहे.
कथा थोडक्यात अशी - परिस्थितीने त्रस्त अशा एका गृहस्थाच्या दारात घेवडा वेल लावलेला असतो. श्री नृसिंह सरस्वती महाराज तेथे भिक्षेसाठी येतात. त्याची पत्नी आपल्याकडे काहीही नसून फक्त हा वेल आणि त्याचे घेवडे आहेत असे सांगते. ती भिक्षा गुरु स्वीकारतात आणि जाताना त्यांचा वेल मुळापासून उपटून जातात. ते पाहून ती स्त्री अत्यंत दुखी होते आणि पती परतल्यावर त्यास सर्व सांगते. तो विचलित न होता ते आवरायला जातो तेव्हा त्या झाडाच्या मुळाशी सुवर्ण मुद्रांनी भरलेला कुंभ मिळतो आणि त्यांचे दारिद्र्य दूर होते.
याची पूर्व कथा अशी - नृसिंह सरस्वती यांचा पूर्व जन्म श्रीपाद श्रीवल्लभ. पिठापुरात बाल श्रीपादांचे तेज,आभा कर्तृत्व याचा अस्विकार करून त्यांचे शेजारी नरसावधानी हे बाल श्रीपाद यांचा तिरस्कार करीत असत. त्यांच्याकडे पिकत असलेली राजगिरा भाजी श्रीपाद यांना प्रिय होती. ती सुद्धा देण्याची दानत त्यांनी दाखवली नाही. तरीही त्यांना मृत्यू शय्येवरून श्रीपदांनी परत आणले व सांगितले की क्षुल्लक भाजीचा मोह तुम्हाला टाळता आला नाही आणि त्यामुळे पुढील जन्मी अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत जन्म घ्याल आणि हे भाजीचे देणे दिल्यावर तुमची परिस्थिती मी सुधारेन.
कोण कुठल्या रूपात याचक म्हणून समोर येईल हे सांगता येत नाही. त्याची योग्यता आपल्याला समजत नाही. ज्यांचे ऋणानुबंध साक्षात श्रीपादांशी जोडले गेले होते ते लोक कित्ती भाग्यशाली??? मग त्यांच्याकडून मिळालेली शिक्षा मिळायला ही तितकेच पुण्य हवे, नाही का? त्यासाठीच उपासनेचा मार्ग म्हणून गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे वाचन!
श्रीपादा शरणं शरणं! शुभम भवतु !