Guru Pradosh Vrat June 2023: प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोषाचे व्रत हे महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेली महादेवांची उपासना, पूजन अत्यंत शुभ मानले जाते. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेल्या पूजनामुळे मान, सन्मान, धन आणि वैभव प्राप्त होते. सर्व प्रकारचे दोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. गुरुवारी प्रदोष येत असल्यामुळे याला गुरुप्रदोष असे संबोधले जाते. सन २०२३ मध्ये ०१ जून रोजी गुरुप्रदोष आहे.
शिवभक्तांसाठी प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या व्रतामुळे एक सहस्र यज्ञाचे पुण्य लाभते. आर्थिक आघाडी उत्तम होते, असे सांगितले जाते. व्रताचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. प्रदोषव्रत प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी करावयाचे असते. ०१ जून रोजी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळी हे व्रत करावे, असे सांगितले जाते.
गुरुप्रदोष व्रत पूजा-विधी
सूर्यास्तानंतर स्नानादी कार्ये उरकून प्रदोषाचे व्रताचरण करावे. शिवपूजन करावे. महादेवांवर पंचामृताचा अभिषेक करावा. या शिवपूजनात बेल, धोत्रा या पानांचा वापर करावा. व्रत-पूजनावेळी अन्य काही नसल्यास बेलपत्र आवर्जून अर्पण करावे. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. महादेवांची आरती करावी आणि या व्रताची कहाणी ऐकावी किंवा त्याचे पठण करावे, असे सांगितले जाते.
गुरुप्रदोषाचे महत्त्व
गुरुवारी प्रदोष येत असल्यामुळे याला गुरुप्रदोष असे संबोधले जाते. गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेवांसोबत गुरुदेवांचे स्मरण करावे. गुरुचा मंत्र किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती म्हणावा. गुरु ग्रहाशी संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे. असे केल्याने गुरु ग्रह मजबूत होऊ शकतो. तसेच गुरुचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्याची मदत होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.