२३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची पूजा केली जाते. महर्षी व्यास हे अलौकिक ऋषी होते. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी!
- पृथ्वीचे भौगोलिक चित्र सर्वात पहिले महर्षी व्यासांनी काढले होते.
- त्यांचे चार महान शिष्य होते. मुनि पैल यांना ऋग्वेद, मुनि वैशंपायन यांना यजुर्वेद, मुनी जेमिनी यांना सामवेद आणि मुनि सुमंतु यांना अथर्ववेद शिकवला.
- महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते लिहिण्याचे काम गणेशाला दिले.
- पाराशर ऋषी आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला सुपूत्र झाला. त्याचे नाव ठेवले व्यास. त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेमुळे आणि अलौकिक शक्तीमुळे जन्मानंतर काही कालावधीतच ते युवा झाले आणि तपश्चर्या करण्यासाठी द्वैपायन द्विपावर निघून गेले.
- अनेक वर्षे तप करून ते काळवंडून गेले म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे म्हटले जाते. तसेच या नामाची आणखी एक कथा अशी सांगितली जाते, की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्ये एका बेटावर झाला आणि त्यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांचे नाव कृष्ण द्वैपायन ठेवण्यात आले.
- वेद व्यास ही एक परंपरा आहे आणि महर्षी व्यास हे त्या परंपरेतले २८ वे शिष्य मानले जातात.
- श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत.
- धर्मग्रंथात सप्तचीरंजीवांचा उल्लेख केलेला आहे. त्यात महर्षी व्यासांचेही नाव घेतले जाते. त्यानुसार महर्षी व्यास आजही जिवीत आहेत, असे मानले जाते.
- सत्यवतीच्या सांगण्यानुसार महर्षी व्यासांनी विचित्रवीर्याची पत्नी अम्बा आणि अम्बालिका यांना आपल्या अद्भूत शक्तीने धृतराष्ट्र आणि पांडु हे पूत्र दिले, तसेच विचित्रवीर्याच्या दासीला विदुर नावाचा पूत्र दिला.
- पुढे व्यासांच्या आशीर्वादाने धृतराष्ट्राला ९९ पूत्र आणि १ कन्या झाली.
- महाभारताच्या शेवटी जेव्हा अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो, ते परत घेण्यासाठी महर्षी व्यास आज्ञा करतात. परंतु अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत घेण्याची कला अवगत नसल्याने तो अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडतो. या घोर पापाची शिक्षा भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामाला देतात. तीन हजार वर्षे तो जखमी अवस्थेत फिरत राहील असेल सांगतात. त्याला महर्षी व्यास सहमती दर्शवतात.
- महर्षी व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि तो महाभारताचे वर्णन धृतराष्ट्राला सांगू शकला.
- महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी आपल्या दिवंगत नातलगांना पाहण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा महर्षी व्यास त्यांना घेऊन गंगातटावर आले आणि त्यांनी सर्व दिवंगत योद्धांचे दर्शन घडवले. ते अंतिम दर्शन देऊन सर्व आत्मे स्वर्गस्थ झाले.
- कलियुगाचा वाढता प्रभाव पाहून महर्षी व्यासांनी पांडवांना स्वर्गात जाण्याची आज्ञा दिली.