येत्या बुधवारी अर्थात १३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते. नरसोबा वाडी हे तर गुरूंचे गुरु परात्पर गुरु दत्त गुरूंचे स्थान. गुरु पौर्णिमेनिमित्त जाणून घेऊया या तीर्थक्षेत्राचा स्थान महिमा!
नृसिंहवाडी हे पवित्र क्षेत्राचे ठिकाणी महाराष्ट्रात कृष्णेच्या काठी असून येथे श्रीगुरु नृसिंहसरस्वती सुमारे १२ वर्षे मुक्कामास होते. म्हणून या भूमीला श्रीगुरुंची कर्मभूमी म्हटले जाते. गुरुचरित्रातील गरीब ब्राह्मणाच्या अंगणातील घेवड्याच्या शेंगांचा वृक्ष उपटून टाकल्याची घटना तसेच योगिनी येऊन श्रीगुरुंना कृष्णेच्या पात्रातून त्यांच्या महालात पूजेसाठी नेत असत, इ. प्रसंग येथेच घडलेले आहेत. भोजन पात्राची कथादेखील येथून जवळच्या गावी घडलेली आहे.
योगिनी मंदिरही पलिकडच्या तीरावर आहे. नारायण स्वामी तसेच सद्गुरुंचे आगमन होणार म्हणून कित्येक वर्षे आधी जंगल तोडून श्रीरामचंद्र योगी यांनी तयारी करून ठेवल्याची कथा येथीलच आहे. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामींनी येथे `घोरकष्टोद्धरण स्तोत्रा'सारखी अनेक स्तोत्रे रचली.
याठिकाणी त्र्यंबकेश्वरासारखीच पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती व शांती मिळण्यासाठी नारायणनागबळी, त्रिपिंडी श्राद्ध करण्याची पद्धत आहे.
येथील पादुका मनोहर, अचल आणि जिवंत आहेत. भगवंतांनी गाणगापूरला जातना त्यांच्या पाठीमागे भक्तांसाठी त्या पादुका सेवा करण्यासाठी ठेवल्या आहेत. ईश्वराचे चैतन्य आपण त्यांच्यामुळे अनुभवत असतो. येथे ज्या पादुका आहेत ते भगवंताचे चिन्हच आहे. भगवंताचे चिन्ह जेथे असेल त्यालाच क्षेत्र म्हणतात. आपण शिवलिंग हे भगवंताचे चिन्ह मानतो म्हणून आपण तिथे दर्शनाला जातो.
श्रीनृसिंह सरस्वती यांचा येथे १२ वर्षे वास होता. श्रीनृसिंह सरस्वती हे गाणगापूरला जाऊन ६५० वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला तरी येथील पादुकांमध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाही. येथील पुजारी वर्ग चांगला जाणकार असल्याने व त्यांचे आचरण चांगले असल्याने तेथे खूप पवित्र वाटते. त्यामुळेच या ठिकाणी अनेक संतअधिकारी पुरुष नित्य येत असतात. नृसिंह वाडी हे ठिकाण शाब्दिक अपभ्रंश झाल्याने नरसोबाची वाडी या नावानेही ओळखले जाते.
अशा या पवित्र स्थळी वर्षभरात कधीही जाऊन दर्शन घेतले तर प्रसन्नच वाटते, परंतु गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तिथे जाता आले तर याहून मोठी पर्वणी काय?