आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. धर्मग्रंथात गुरूला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे या दिवशी गुरूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. हा दिवस महर्षी वेद व्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचीही पूजा केली जाते. ती पूजा आपण करूच, पण त्याबरोबर ज्या चुका टाळल्या पाहिजेत त्या पुढीलप्रमाणे-
१. शास्त्रानुसार शिष्याने कधीही गुरूच्या बरोबरीने आसनावर बसू नये. गुरूचा दर्जा देवाच्याही वरचा आहे. त्यामुळे नेहमी गुरुंच्या पायाशी बसावे. तसे न करणे हा गुरुंचा तसेच ईश्वराचा अवमानही आहे. (Guru Purnima 2022)
२. गुरुंच्या नजरेस नजर न देता कायम त्यांच्या पायाशी नजर ठेवा, जेणेकरून तुम्ही नेहमी नम्र राहाल.
3. गुरुंचा अपमान कधीही करू नका. एखादी गोष्ट पटली नाही, तर त्यावर चिंतन करा, परंतु गुरुंच्या शब्दाचे उल्लंघन करू नका.
४. गुरुंसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी, प्रसिद्धीचे प्रदर्शन करू नका. जे मिळाले आहे ते त्यांच्या कृपेने मिळाले आहे हे लक्षात ठेवा. गुरूंच्या भाषणातील प्रत्येक शब्द तुमच्या सर्व संपत्तीवर भारी आहे. त्याच्या ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही.
५. गुरुंशी कधीही खोटे बोलू नका. त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा. कारण तेच आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवणारे आहेत, हे लक्षात ठेवा.
गुरु कोणाला म्हणावे?
आपले माता, पिता, शिक्षक, पुस्तकं, समाज, अनुभव, निसर्ग हे आपले गुरु आहेत. त्यांच्याकडून पदोपदी आपण शिकतच असतो, पण त्याचबरोबर दत्त गुरु हे तर परात्पर गुरु आहेत, जे आपल्याला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून दत्त चरणांचीदेखील आराधना करावी.
गुरुपौर्णिमेला गुरुची पूजा कशी करावी?
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूला उच्च आसनावर बसवावे. त्यांचे पाय पाण्याने धुवावे आणि स्वच्छ कापडाने पुसावेत. त्यानंतर त्याच्या चरणी पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करावी. त्यांना फळे, मिठाई दक्षिणा अर्पण करावित आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यावा!