गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणनिर्देशनार्थ काही भेटवस्तू देण्याचा प्रघात पूर्वापार आहे. आजही शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा शिक्षकांसाठी आठवणीने एखादे फुल, भेटपत्र, मिठाई अशा गोष्टी घेऊन जातात. पालक त्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण जे शिक्षक आपले भवितव्य घडवतात, त्यांच्याप्रती आपल्या पाल्याने कृतज्ञता बाळगावी असा त्यामागचा हेतू असतो. मात्र अशी ऐहिक सुखांशी संबंधित गोष्टी दिल्याने गुरु प्रसन्न होतात का? तसे होणार असतील तर ते शिष्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का? गुरूंना नेमके काय दिले तर ते खुश होतील याबद्दल सद्गुरुंचे म्हणणे काय आहे ते जाणून घेउ.
सद्गुरू म्हणतात, 'गुरु शिष्याला घडवत असतात, ती एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे गुरूंची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तपश्चर्या असते. ज्याप्रमाणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेम्बरमध्ये आंब्याचे झाड पाहिले तर त्याला आंबा लागलेला दिसत नाही, मात्र तेच झाड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बघाल तर त्या झाडाला फुलं अर्थात मोहोर आलेला असतो. त्या झाडाची फांदी, मूळ, फुल गोङ लागत नाहीतर, मात्र मार्चपासून मे पर्यंत तेच झाड कैऱ्यांनी लगडलेले दिसते आणि त्या कैऱ्या काहीकाळाने मधुर रस देणारे आंबे बनून तयार होतात. या तयारीच्या खुणा आधी दिसत नाहीत मात्र झाडात दिसत नसलेला गोडवा फळात उतरतो. तीच प्रक्रिया गुरु शिष्यांच्या बाबतीत घडत असते. गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात. तो यशस्वी होईपर्यंत लागणारा काळ हा गुरूंसाठी तपश्चर्येचा काळ असतो. शिष्य यशस्वी झाल्यावर गुरूंना ते फळ मिळते. मग त्याची परतफेड कशी करावी?
गुरूंच्या ऋणातून कोणताही शिष्य उतराई होऊ शकत नाही आणि त्याने होऊही नये असे सद्गुरू सांगतात. ते म्हणतात शिष्यांनी गुरूंना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडून कायम घेत राहावे. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे गुरूंकडून जे घेतलेले आहे ते वापरून फेकून देऊ नये किंवा विसरून जाऊ नये. गुरूंकडून घेतलेले ज्ञान पुढे हस्तान्तरीत करावे मात्र ते वाया जाऊ देऊ नये. गुरूंना शिष्याकडून मिळालेली ही भेटच सर्वात जास्त प्रिय ठरू शकते. म्हणून गुरूंनी कायम देत (ज्ञान) राहावे आणि शिष्यांनी कायम गुरूंकडून ज्ञान घेत राहावे असे सद्गुरू सांगतात.