संत गुलाबराव महाराजांना एकदा एका पाश्चात्य व्यक्तीने विचारले, की भारतीय संस्कृतीची थोडक्यात ओळख किंवा वर्णन करायचे असेल तर कसे कराल? त्यांनी उत्तर दिले, 'गुरु शिष्य परंपरेतून!' भारतामध्ये ही परंपरा जेवढी जुनी तेवढी अन्यत्र कुठेही आढळणार नाही. ही परंपरा युगानुयुगांपासून सुरू आहे. तिचे महत्त्व आपणही जाणून घेऊ.
आपले आयुष्य घडवण्यात गुरुंचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ही केवळ व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते. म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवालाही गुरु मानले आहे, वाटसरूला गुरु मानले आहे, तसे मार्गदर्शन करणाऱ्याला गुरु मानले आहे. ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात. त्यांच्याप्रती ऋण निर्देश करण्यासाठी ही तिथी राखीव ठेवली आहे.
तिथीचे वैशिष्टय
आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण याच तिथीवर महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेला प्रथम व्यासांची पूजा केली जाते. एक वचन आहे - व्यासोचिष्टम् जगत् सर्वम्. याचा अर्थ असा की, जगात असा कोणताही विषय नाही, ज्याला महर्षी व्यासांनी स्पर्श केले नाही की भाष्य केले नाही. एवढे ते महाज्ञानी होते. त्यांनीच चार वेदांचे वर्गीकरण केले. अठरा पुराणे, महाभारत इ. साहित्य महर्षी व्यासांमुळेच आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणूनच त्यांना 'आदिगुरु' म्हणतात. गुरुपरंपरा त्यांच्यापासून सुरू झाली असे मानले जाते. आद्यशंकराचार्य हे महर्षी व्यासांचे अवतार मानले जातात. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा दिवस त्यांच्या नावे साजरा केला जातो. संस्कृतानुसार गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा! आपल्या आयुष्यातील आळस, अनैतिकता, अविवेक, अशास्त्रीय गोष्टींचा अंधःकार दूर करणारी व्यक्ती गुरु मानली जाते. तिच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, म्हणून केवळ कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते.
गुरु पौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्व
या दिवशी गुरुंचे स्मरण, पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते. या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणात सक्रिय होतात. गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो. एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्त्र पटींनी पुण्य लाभते असे ज्योतिष शास्त्र सांगते.