Guru Pushya Yoga October 2024: गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. चातुर्मास सुरू असून, दीपोत्सवाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. (Gurupushyamrut Yoga October 2024 Date And Time)
गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवेलागणीच्या वेळेला श्रीसूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे. तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा, असे केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. (Gurupushyamrut Yoga October 2024 Significance)
देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा लाभदायक
या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून या देवतांचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले गेले आहे. तसेच श्रीसुक्त , पुरुषसुक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी. कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. (Guru Pushya Yoga October 2024 Importnace)
लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी काही उपाय उपयुक्त
या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून 'ओम् श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिन्यै धनधान्य समृद्धि देहि देहि नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ असते. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्हीसांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असतात.
कुलदेवीची मनोभावे पूजा अन् सेवा
पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे, असे मानले जाते.
शनी आणि गुरुची उपासना अन् उपाय
शनी ही न्यायाची देवता मानली गेली आहे. आताच्या घडीला शनी आपले स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असून, देवता गुरु ग्रह आहे. शनीची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी शनी ग्रह आणि गुरु ग्रहाच्या मंत्रांचे जप, उपासना तसेच या दोन्ही ग्रहांशी संबंधित उपाय करावेत. असे केल्याने शनी आणि गुरु ग्रहाचा कृपालाभ होऊ शकतो. तसेच या ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.
दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पडू शकेल
पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे. गुरुपुष्यामृताच्या मुहुर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक, अध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो, असे म्हटले जाते. या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येऊ शकते. तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.