आपल्या आयुष्याची नौका जेव्हा जेव्हा डगमगते तेव्हा अत्यंत आवश्यकता भासते ती सुयोग्य मार्गदर्शन,आधार, प्रेम, प्रेरणेची... हे दोन पैशांच्या मिळकतीपेक्षा जास्त महत्वाचे वाटते. हल्ली अवतीभवती माणूस छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकाचे पाऊल उचलताना दिसतोय.. त्यांच्यामध्ये सतत तणाव, नैराश्य, चिडचिड, द्वेष, ईर्षा, अनुत्साह, आळस, अस्थिरता यांनी पूर्णपणे ग्रस्त आहे. या सर्व गोष्टींचं मूळ सद्गुरू तत्वाशी जोडले गेलेले आहे. त्या मुळाशी जर आपलं पूर्ण समर्पण असेल तर आपण कितीही संकटे आली तरी भरकटत नाही उलट त्याचा सपशेल पराभव करत जोमात जीवनाचा प्रवास प्रगतीकडे नेत राहतो.. कारण सद्गुरू माऊली आपलं सदा सर्वकाळ हितचिंतक म्हणून कार्यरत असते..म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात सद्गुरू हे नेहमी बहुमोल भूमिका पार पाडत असतात..
जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ (आषाढ पौर्णिमा) हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिध्द गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहेत.
‘गुरुविण कोण दाखविल वाट’ हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सदगुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सदगुरुंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वत:हूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्धकर्मानुसार आपल्याला सदगुरु भेटतात. सदगुरुच सर्व काही करवून घेत असल्यामुळे नामधारकाच्या ‘मी’ ला कुठेही वाव नसतो. सदगुरुंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु, एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते.
गुरूंचे दर्शन झाल्यानंतर त्यांची ‘सेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.
भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.
सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान.
गुरु कोणाला करावे ? जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच -
गुरुकृपा ही केवलम्..! गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही.
आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्श देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तिर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सदगुरुंचा महिमा अपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सदगुरु म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांतीसुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्तिज्ञानाची पेठ, शुध्दभाव इ. गोष्टी त्यांचे ठायी असतात.
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला गुरू दीक्षा देतात तेव्हा त्याचा तो दुसरा जन्म असतो. त्याच्या उपासना कालावधीत सदगुरु शिष्याचे सर्वतोपरी रक्षण करतात. सदगुरु आपल्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.
कधीच कुठल्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा हे महापाप समजले गेलेले आहे..गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य आणि चिरंतनशक्ती आहे.
प्रपंच सोडून वैराग्यमय जीवन पत्करत परमार्थ करावा असे सद्गुरू कधी सांगत नाही. ते संसारात राहून आसक्ती, भौतिक सुखाच्या कल्पनेपलीकडले आत्मानंद मिळवण्यासाठी प्रयत्न करा यासंबंधी मार्गदर्शन ते शिष्यांना सदैव करत असतात.अशा या ज्ञानमूर्ती सद्गुरूंना शरण जाणे म्हणजेच स्वतःच्या आयुष्याचे सार्थक आहे..! त्यामुळे एक निश्चित आहे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही..!