- नीता ब्रह्मकुमारीभक्तीमध्ये सूर्योपासनेचे, सूर्य नमस्काराचे खूप महत्त्व आहे. सूर्याला जल प्रदान करणे, नमस्कार करणे, सूर्याची कोवळी किरणे मिळावीत यासाठी सकाळी व्यायाम करणे. या सर्व गोष्टी आपण करतच असू; पण ज्ञानाचा, शक्तींचा स्रोत या निसर्गाचा मालक ईश्वर आहे. त्याच्या सान्निध्यात सकाळी लवकर उठून नामस्मरण करून त्याची आठवण करणे या गोष्टी मनाला शक्तिशाली बनवितात.मन-बुद्धी शक्तिशाली असेल, तर दिवसभरात केलेली छोटी-मोठी कर्मे श्रेष्ठ बनतात. ती चांगली असतील तर स्वत:ला समाधानही मिळते. मग कर्माची सावली छोटी असो वा मोठी, त्याची भीती वाटणार नाही. काहींना आपल्याच सावलीची भीती वाटते, तसेच केलेल्या कर्माची जाण असल्याने आपणच चिंता, भय यांनी ग्रस्त होतो. म्हणून कर्माचे नियम, कर्मफळ यांबद्दल सतत जागृत राहण्याची आवश्यकता आहे.वास्तविक आपले जीवन कर्मांचा खेळ आहे. कधी कोणत्या डावात आपली हार किंवा जय होईल, हे आपल्यालाच माहीत नाही. कारण, हा खेळ जन्मोजन्मीचा आहे. जसं खेळामध्ये सतर्क राहावे लागते, मग तो खेळ कोणताही असो, तसेच कर्मामध्येही नेहमी जागृत राहण्याची आवश्यकता आहे. हा खेळ कधीही न संपणारा आहे. काही कर्मांपासून मुक्त व्हायचे असेल, तर जितके दु:ख दिले असेल, तर त्यांना तितकेच सुख देऊन तो हिशेब संपवावा किंवा स्वच्छ मनाने ईश्वरासमोर आपल्या चुका सांगून, माफी मागून मन हलके करायला हवे किंवा इतके श्रेष्ठ कर्म करावे की पुण्याचे बळ आपल्यासाठी काम करीत राहील व येणाऱ्या समस्या या शक्तिशाली होऊन त्या संपवाव्यात. हा खेळ खूप रहस्यांनी भरलेला आहे. त्याला समजण्यासाठी मनाला शांत ठेवावे. विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराची प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी. मन प्रसन्न असले की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सहज दूर करण्याची शक्ती आपल्यात येते. अज्ञानाच्या रात्री दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. हा प्रकाशच आपले मार्गदर्शन करीत राहील.
विचारांना शांत करण्यासाठी लावा ईश्वराची आठवण काढण्याची सवय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:03 AM