युद्ध अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते. शंभर कौरव आणि त्यांच्या विरोधात अवघे पाच पांडव! वास्तविक पाहता, युद्धात काय होईल याची भीती पांडवांना वाटायला हवी होती. पण झाले उलटच! दुर्योधन अस्वस्थ होता. काहीही करून त्याला विजय मिळवायचा होता. युद्धाची सगळी तयारी वेगाने सुरू होती. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ सज्ज होते. शस्त्रास्त्रांना धार लावण्याचे कामही पूर्ण झाले होते. तयारीत आणखी काही कमतरता राहू नये, या विचाराने दुर्योधन इच्छा नसतानाही नाईलाजाने श्रीकृष्णाजवळ गेला.
श्रीकृष्ण विरोधी पक्षाच्या बाजूने आहेत, हे माहित असूनही तो आपल्याला मार्गदर्शन करतील, याची दुर्योधनाला खात्री होती. त्यानुसार श्रीकृष्णाला भेटून दुर्योधन म्हणाला, 'कृष्णा, मला या युद्धात विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मी काय करू सांग?'
श्रीकृष्ण हसला. म्हणाला, 'दुर्योधना, युद्धात विजय मिळावा, हे तुझे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. मात्र, उपाय विचारण्यासाठी तू व्यक्ती चुकीची निवडली आहेस. तुला विजय मिळवावा असे वाटत असेल, तर तुझ्या आईला, अर्थात गांधारी मातेला भेट, तिला हा प्रश्न विचार आणि तिचा आशीर्वाद घे. तो मिळाला, तर तुला कोणीही हरवू शकत नाही.'
श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून दुर्योधन विचार करू लागला, 'एवढेच ना, त्यात काय अवघड आहे. आता जातो आणि आईचा आशीर्वाद घेतो.' असे म्हणत दुर्योधनाने गांधारीच्या शयनमंदिरात प्रवेश केला. गांधारी मंचकावर बसली होती. दुर्योधनाची चाहूल लागताच उठून उभी राहिली. दुर्योधनाने आईला वाकून नमस्कार केला आणि तिचे चरणस्पर्श करत म्हटले, `माते, मला युद्धात विजयी व्हायचे आहे, मला तुझा आशीर्वाद हवा आहे.'
हे बोलणे ऐकताच गांधारी दोन पावले मागे सरकली आणि तिने दुर्योधनाच्या मस्तकावरील हात बाजूला केला. आईशी बोलण्याची वेळ कदाचित उचित नसावी. असे समजून दुर्योधन चार दिवसांनी परत आईच्या भेटीसाठी गेला. तेव्हाही त्याने नमस्कार करत आईकडे तोच आशीर्वाद मागितला.
यावेळी मात्र गांधारी म्हणाली, 'दुर्योधना, हा आशीर्वाद मी तुला देऊ शकत नाही. कारण, कोणतीही आई आपल्या मुलांना चुकीच्या वाटेवर जाण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही. मीदेखील करणार नाही. तू आणि तुझ्या भावंडांनी निवडलेला मार्ग अधर्माचा आहे. तो तुम्हा सर्वांना लयाला नेणार आहे. तुझ्या कुकर्मात मी आशीर्वाद देऊन भर टाकू इच्छित नाही. त्योपक्षा याक्षणीदेखील तू तलवार म्यान केलीस आणि युद्ध थांबवलेस, तर कित्येकांचे प्राण वाचतील आणि माझेच काय, तर सर्वांचे आशीर्वाद लाभतील'
हे ऐकून दुर्योधन काही न बोलता फणकारत तिथून निघून गेला. मात्र, तो कृष्णाच्या बोलण्याचे मर्म समजू शकला नाही. गांधारीच्या मुखातून कृष्णाने दुर्योधनाला सावध होण्याची आणखी एक संधी दिली होती. पण त्याला ती ओळखता आली नाही, म्हणून त्याचा पराभव झाला आणि कौरवांवर पांडवांनी मात केली.
विषयासक्त झालेल्या प्रत्येकाची स्थिती दुर्योधनाप्रमाणे होते. याबाबत समर्थ रामदास स्वामी म्हणतात,नव्हे सार संसार हा घोर आहे,मना सज्जना सत्य शोधूनि पाहे, जनी वीष खाता पुढे सुख कैचे,करी रे मना ध्यान या राघवाचे!