हनुमान चालीसा ही अवधी भाषेत केलेली काव्यरचना आहे. त्यात रामभक्त हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे. हे एक अतिशय लघु काव्य आहे. ज्यामध्ये पवनपुत्र हनुमानाची सुंदर प्रशंसा केली गेली आहे. यामध्ये केवळ बजरंग बलीच नाही, तर प्रभू श्रीरामांचे व्यक्तिमत्त्वही सोप्या शब्दात कोरलेले आहे. चालीसा शब्दाचा अर्थ 'चाळीस' असा आहे कारण या स्तुतीमध्ये दोन कडव्यांच्या परिचय वगळता चाळीस श्लोक आहेत. त्याचे लेखक गोस्वामी तुलसीदास आहेत.
हे काव्य जरी संपूर्ण भारतात लोकप्रिय असले,तरीदेखील विशेषतः उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व हिंदूंना हे स्तोत्र पाठ असते. हिंदू धर्मात बजरंग बली हे शौर्य, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जातात. हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, मारुतीनंदन, केसरी नंदन, महावीर इत्यादी नावांनीही ओळखले जाते. हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत.
दररोज मारुतीरायाचे स्मरण करून त्याचा मंत्र जप केल्यास मानवाचे सर्व प्रकारचे भय दूर होते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. तुम्हालाही राग, ताणतणाव, नैराश्य यावर मात करायची असेल, तर दररोज थोडासा वेळ काढून भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करा. या सुंदर काव्यरचनेच्या श्रवणाने किंवा पठणाने भक्तिभाव जागृत होतो.