हनुमान हा मूळचा शंकराचा सेवक होता, अशी कल्पना बंगालकडील शैव सांप्रदायात रूढ झालेली दिसते. अनेक बंगाली कवींनी `शिव-राम युद्ध' काव्यस्वरूपात वर्णिले आहे. मुळात शिवाचे आणि रामाचे युद्ध का झाले, त्याचा परिणाम काय झाला?
यासंबंधी असे सांगण्यात येते, की वनवासात असताना लक्ष्मण नेहमी रामासाठी फळे आणि कंदमुळे आणण्यासाठी रानावनात जात असे. एकदा तो शंकराच्या उद्यानात गेला. त्या उपवनाचा रक्षणकर्ता हनुमान होता. त्याने लक्ष्मणाला हटकले, तेव्हा त्या दोघांत युद्ध जुंपले. बराच काळा झाला, कोणी मागे हटेना. ते दोघे अहोरात्र लढत होते.
लक्ष्मणाला उशीर झालेला पाहून श्रीराम त्याचा शोध घेत त्या उद्यानाजवळ आले. तिकडून शंकरही तेथे आले. परिणामी राम आणि शंकर यांचे युद्ध सुरू झाले. दोघेही तुल्यबळ असल्याने दोघांमध्ये समेट झाला. समेटाच्या अटीप्रमाणे हनुमानाला भगवान शंकराकडून श्रीरामाकडे सेवक म्हणून पाठवण्यात आले. त्या दिवसापासून हनुमानाचा शंकराशी असलेला संबंध संपुष्टात आला व तो रामभक्त बनला. हनुमान शंकराच्या सेवक-स्वामी संबंधाविषयी असा किंवा वेगळ्या प्रकारचा घटनाक्रम सांगणारी कथा शिवपुराणात आढळत नाही.
या कथेचा मूळ आधार मग कोणताही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते, की वायुतनय हनुमान हा रुद्राचा म्हणजे पर्यायाने शंकराचा अवतार मानला जातो, ही कल्पना फार प्राचीन काळापासून रूढ झालेली आहे. हनुमान रामाचा संबंध लक्षात घेऊन हनुानस्वरूपात शंकर अवतीर्ण झाले किंवा शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे शंकराचे वीर्य अंजनीच्या गर्भात ठेवल्यामुळे तिला गर्भधारणा झाली व तिच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला व तो रामाचेी कार्य सिद्ध करण्यासाठीच झाला, ही कल्पना मागून विकसित झाली असावी.
दुसरी गोष्ट यावरून सिद्ध होते, की सेवक म्हणून का होईना शंकरासारख्या देवाशी हनुमानाचा संबंध मानला गेला आहे. दुसऱ्या कोणत्याही वानरांचा नाही. असाही एक विचार मांडता येईल, की पूर्वभारतात प्रथम शैवांचे व शाक्तांचे प्राबल्य होते. नंतर वैष्णव संप्रदाय आघाडीवर पोहोचला. तेव्हा शंकर राम तुल्यबळ दाखवण्यात दोघांचाही मान सारखा राखला गेला असून हनुमानासारखा महापराक्रमी वीर पुरुष मूळचा आमचाच, असे मागे पडत चाललेल्या शैवांना अभिमानाने सांगता येण्यासारखी सोयही या कथेकरवी करून ठेवली असावी.
याबरोबरच आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे भगवान शंकरांनी केलेल्या हलाहल प्राशनाची. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल प्राशन केल्यावर भगवान शंकरांच्या अंगाचा दाह झाला. सर्व उपायाअंती `राम' नामाची मात्रा लागू पडली. तेव्हाच भगवान शंकरांनी ठरवून टाकले, की पुढच्या अवतार कार्यात रामाचा सेवक म्हणून मीदेखील अवतार घेईन. विष्णूंच्या सातव्या राम अवताराच्या वेळी रुद्राने अकरावा अवतारा हनुमानाच्या रूपाने घेतला आणि हनुमान रामसेवक झाला.