भगवंताचे निकटवर्ती हनुमान यांना प्रसन्न करून सर्व सुखाची प्राप्ती करता येते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यासाठी अनेक स्तोत्र सांगितली जातात. त्यापैकीच एक साधना आहे लांगूल साधना. ती कशी करतात आणि त्याचे काय फळ मिळते, पाहूया.
आगच्छ भगवान देव स्थानेचात्र स्थिरोभव,यावत पूजां करिष्यामि तत्वत्त्वं संनिधोभव।
ही साधना मारुतीच्या शेपटीशी संबोधित असून अतिशय प्रभावी समजली जाते. एका लाकडी फळीवर मध्यभागी दास मारुतीचे चित्र घ्यावे. अर्थात असे चित्र ज्यात मारुतीचे नमस्कारासाठी दोन्ही हात छातीजवळ जोडलेल्या स्थितीत आहेत, दोन्ही पाय जुळवलेले आहेत व मस्तक विनम्र भावनेने झुकलेले आहे. अशा स्वरूपाचे चित्र शक्य असल्यास स्वत: रेखाटावे अन्यथा चित्रकाराकडून रेखाटून घ्यावे.
रेखाटून घेण्यामागचे कारण असे, की या चित्रात शेपूट खुणेपुरतीच असावी. नंतर त्यावर फुलाने किंचित पाणी शिंपडून त्या प्रतिमेचे शुद्धीकरण करावे. नंतर त्या प्रतिमेचे ठिकाणी मारुतीची आवाहनपूर्वक प्रतिष्ठापना करावी व ती आपल्या पूजेत ठेवावी.
दररोज नित्यपूजा करताना सुरुवातीला दिलेला मंत्र म्हणावा आणि फळीवर रेखाटलेल्या प्रतिमेची केवळ गंध व फुलाने पूजा करावी. ती हाताने किंवा ओल्या वस्त्राने पुसू नये. त्यानंतर खुणेसाठी ठेवलेल्या शेपटीच्या पुढे बोटाने गंधाचा एक ठिपका द्यावा. मग आपली मनोकामना मारुतीला निवेदन करून त्याची करुणा भाकावी.
यानंतर पुढे प्रत्येक दिवशी आधीच्या ठिपक्याच्या पुढे एक याप्रमाणे नवा एक ठिपका द्यावा. हे ठिपके अशा रितीने खालून वरच्या बाजूला देत जावे, की त्या ठिपक्यांच्या शेपटीचा एकेक वेढा मारुतीच्या प्रतिमेभोवती पडत जाईल. अशा तऱ्हेने ११ वेढे पूर्ण झाले, की ती पुच्छवेष्टित प्रतिमा विसर्जित करावी म्हणजे ओल्या वस्त्राने पुसून काढून ती फळी स्वच्छ करावी. यानंतर पुन्हा दास मारुतीची नवीन प्रतिमा रेखाटावी व सर्व विधी वरीलप्रमाणेच करावा. इच्छापूर्ती होईपर्यंत हे व्रत करावे.
या लांगूल साधनेमध्ये खंड पडू देऊ नये. तसेच साधना मध्येच सोडून देऊ नये. या लांगूल साधनेमुळे अशक्यही शक्य झाल्याचे अनेक भक्तांना अनुभव आहेत.