हनुमान हा रामभक्त सप्त चिरंजिवांपैकी एक आहे, असे मानले जाते. रामाच्या वराने हनुमानाला चिरंजिवित्व प्राप्त झाले व सप्त चिरंजिवांच्या मालिकेत त्याला स्थान प्राप्त झाले. याचा अर्थ असा की या पृथ्वीतलावर आजमितीलाही हनुमानाचे वास्तव्य आहे. त्याने प्रभू रामचंद्राजवळ अशी इच्छा व्यक्त केली होती, की ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे, तेथे मी अदृश्य रूपात उपस्थित असेन.
असे असले तरी हनुमानाची नित्याची निवासस्थाने किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या अशी मानली जातात. तो किंपुरुषवर्ष येथे श्रीराध्यानात मग्न असतो. गंधर्व रामगुणगान करतात. परिणामी हनुमानाच्या डोळ्यात आनंदाश्रु असतात. किंपुरुषवर्ष हे पुरातन काळातील असे ठिकाण होते, जिथे किन्नरांचे वास्तव्य असे.
हेमकूट पर्वतावरील रंगवल्लीपूर नगरात श्रीरामपूजेसाठी हनुमान नेहमी येतो. देवीभागवतात किंपुरुषवर्षात राम सीताही प्रत्यक्ष राहातात व हनुमान रामपूजेत मग्न असतो असा उल्लेख आहे. भागवतातही शुक मुनींनी परीक्षितीला `हनुमान किन्नरांसह किंपुरूषवर्षात वास्तव्य करून रामाची उपासना करतो' अशे निक्षून सांगितले आहे.
हनुमानाचे वास्तव्य हिमालयात आहे, असा उल्लेख आढतो. अयोध्या ही तर हनुमानाच्या प्रभूची नगरी! त्यामुळे तेथे त्याचे वास्तव्य राहणाराच.
याप्रमाणे किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या या तीन ठिकाणी हनुमानाचा निवास आहे, असे संशोधक मानतात. परंतु भक्तांच्या दृष्टीने मात्र जिथे जिथे रामकथा चालते, तिथे हनुमान उपस्थित असतातच!