मारुतीचा जन्म होताच त्याने आकाशात अनेक योजने उंच उडी मारली, त्या वेळेस सूर्य उगवत होता. मारुतीला ते लाल फळ वाटले. त्याने सूर्याला पकडले, तर जगात प्रलय येईल म्हणून इंद्राने आपले वज्र मारुतीवर टाकले. त्यामुळे मारुतीची हनुवटी फुटली आणि तो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. वायुदेव ते पाहून रागावला. सारी पृथ्वी हालू लागली. तेव्हा इंद्राने वायुदेवाची समजुत घातली. `वायुदेवा, यापुढे मारुतीला माझ्या वज्राचे भय वाटणार नाही.' तेव्हापासून मारुतीचे नाव हनुमान असे प्रसिद्ध झाले.
हनुमान मोठा झाल्यावर सुग्रीवाचा सचिव असे श्रेष्ठ पद त्याला मिळाले. ऋषमूक पर्वतावर हनुमान राम लक्ष्मणांकडे सुग्रीवाचा दूत म्हणून गेला. पुढे सीतेला शोधण्याकरीता मारुती निघाला, तेव्हा सीतेला खूण पटावी, म्हणून रामाने आपली अंगठी त्याच्याजवळ दिली. लगेच, 'उडाला उडाला कपि तो उडाला, समुद्र उलटोनि लंकेसि गेला' मारुतीने सागरावरून उड्डाण केले होते. रामाचा दूत म्हणून त्याने सीतेचा शोध घेतला आणि रामाची अंगठी तिला दाखवून धीर दिला. तिनेही मारुतीला आपल्या वेणीतील मणी रामाला देण्याकरीता दिला. त्यानंतर मारुती निर्भयपणे रावणाला भेटायला गेला.
त्याला रावणाने उच्चासन दिले नाही. तेव्हा मारुतीने आपले शेपूट इतके लांबवले आणि त्याची उंच गुंडाळी केली की त्यावर बसल्यावर मारुतीचे आसन रावणाच्या सिंहासनाहून अधिक उंच झाले. रावणाच्या अशोकवनाला आणि अनेक राक्षसांना मारुतीने नाश केला होता. त्याचा जाब रावणाने विचारला आणि त्याचे ऐकून घेण्याआधीच त्याला शिक्षा म्हणून शेपटीला आग लावून दिली.
मारुतीने आपले शेपूट इतके लांबवले, की या घरावरून त्या घरावर जाताना सारी लंका जळून खाक केली. मारुतीला मात्र काहीच इजा झाली नाही.प्रत्यक्ष रावणाशी लढताना, लक्ष्मणाला बाण लागताच तो बेशुद्ध होताच, त्याला बरे करण्यासाठी, आयुर्वेदाचार्यांनी सांगितलेली संजीवनी वनस्पती आणण्यासाठी तो द्रोणागिरी पर्वतावर गेला आणि संजीवनीचा उपयोग सर्वांना व्हावा, म्हणून तो पर्वतच घेऊन आला. त्याने आपल्या भीमपराक्रमाने लक्ष्मणाला जीवदान दिले.रामाचा आदर्श आणि एकनिष्ठ सेवक म्हणून मारुतीचे नाव घेतले जाते.
एखाद्याने एकदम एखादे धाडस केले किंवा कामात प्रगती केली, की आपण तला `हनुमान उडी मारली' असे म्हणतो. तसेच एखादे काम लांबत चालले असेल, तर ते 'मारुतीच्या शेपटीसारखे लांबत आहे' असे म्हणतो. एखाद्या गोष्टीला अर्थ नाही, असे सांगताना `यात काही राम नाही' असे म्हणतो. याचाही संबंध हनुमानाशी आहे. रावणाशी युद्ध जिंकून परत आल्यावर सीतेने सर्वांना काही ना काही भेट दिली. या रामकार्यात सिंहाचा वाटा उचललेल्या हनुमंताला विशेष भेट म्हणून सीतेने आपला अत्यंत प्रिय असलेला नवरत्नांचा हार दिला. हनुमंताने तो घेतला. आणि त्या नवरत्नांमध्ये रामाचा शोध घेऊ लागला. परंतु, रत्न फोडून पाहिली, तरी राम दिसला नाही. मात्र, त्याच्या या कृत्याने हार विखुरला. सीतेला वाईट वाटले. तिने हनुमंताला विचारले, `तुझ्या हृदयात तरी राम आहे का?' यावर क्षणाचाही विलंब न करता, हनुमंताने छाती फाडून हृदयस्थ विराजमान झालेले प्रभू रामचंद्र दाखवून दिले.
अशा या थोर राम भक्ताची गणना सप्त चिरंजीवांमध्ये केली जाते. त्याच्यातला एखादा तरी गुण आपल्यात यावा आणि आपल्यालाही आयुष्यात हनुमान उडी घेता यावी, म्हणून त्यालाच मनोभावे शरण जायचे.
पवनसुत हनुमान की जय!