यंदा १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे आणि योगायोगाने त्यादिवशी हनुमंताचा वार अर्थात शनिवारदेखील आहे. त्यानिमित्ताने हनुमंत उपासनेसाठी पुढील गोष्टी उपयुक्त ठरतील.
संकट निवारणासाठी कोणी हनुमंताची उपासना करतो, तर कोणी मनोकामना पूर्तीसाठी, कोणी मन:शांतीसाठी, कोणी विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी. अर्थात यासाठी उपासकाचे ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची नितांत आवश्यकता असते.
हनुमान भक्त विश्वनाथ लघाटे यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. त्या उपासनेची त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी, म्हणून त्यांनी उपासनेचे मार्ग सांगितले.
१. सलग ११ दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्याचे दर्शन घेणे.
२. दररोज हनुानाच्या मंदिरात जाऊन ११, २१, ३१, ४५,५१ प्रदक्षिणा घालणे.
३. दररोज `भीमरुपी महारुद्रा' या मारुती स्तोत्राची २१ आवर्तने करणे.
४. ही आवर्तने करताना हनुमानाच्या मूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करणे.
५. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणे.
६. `वानरगीते'चे रोज एक पाठ करणे.
७. २१,४२, १२१ दिवस हनुमानाच्या प्रभावी मंत्राचा जप करणे.
८. एखादे आकस्मिक संकट, गंडांतर किंवा खोटा आळ किंवा आरोप आल्यास समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राची ७,१४,२१ पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वत:च्या कपाळावर लावावा आणि घरात फुंकावा.
९. हनुमान मंदिरात किंवा ११ मारुतींच्या स्थानांपैकी एखाद्या स्थानावर बसून स्वहस्ताक्षरात मारुती स्तोत्र लिहून काढावे. त्याच्या ८ प्रती काढून ८ अविवाहित पुरुषांना वाटाव्यात. तसेच त्यांच्याकडून या स्तोत्राचे सामुदायिक पठण करून घ्यावे. नंतर सर्वांना भोजन व दक्षिणा द्यावी.
१०. 'ओम नमो भगवते वासुदेवनंदनाय नम:' या प्रभावी हनुमान मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास दु:ख, दैन्य, वा दारिद्रय तुमच्या आसपास फिरणार नाही.
वरील उपासनांपैकी कोणतीही एक उपासना वाचकांनी निष्ठापूर्वक केल्यास त्यांच्यावर हनुमंताची कृपा होईल, यात तिळमात्रही संशय नाही!