हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्यात अनेकविध सण-उत्सव साजरे केले जातात. तसेच नाना प्रकारची व्रतेही आचरली जातात. मराठी वर्षातील पहिले नवरात्र चैत्रात येते. चैत्र पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने तिचे महत्त्व विशेष आणि वेगळे असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी हनुमान जयंतीला विशेष योग जुळून येत असून, शनीदेवांना प्रसन्न करण्याची उत्तम संधी आहे. जाणून घेऊया... (Hanuman Jayanti 2022)
यंदाच्या वर्षी शनिवार, १६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती आहे. शनिवार असल्याने या वर्षीची हनुमान जयंती विशेष मानली गेली आहे. मंगळवार आणि शनिवारी येणारी हनुमान जयंतीचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते. सन २०२२ मधील हनुमान जयंतीला विशेष योग जुळून आले आहे. या दिवशी संपूर्ण दिवस रवि योग आणि हर्षण योग असून, हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत. तसेच या दिवशी हस्त आणि चित्रा नक्षत्र आहे. (Hanuman Jayanti 2022 Date)
शनी महादशा मुक्तीचे उपाय
ज्योतिषीय अभ्यासक आणि धर्माचे तज्ज्ञांनुसार, हनुमंतांची आराधना केल्यास शनीचा प्रतिकूल प्रभाव बहुतांश प्रमाणात कमी होऊ शकतो. यासंदर्भात रामायणातील एक कथा प्रसिद्ध आहे. शनिवार हा हनुमान आणि शनीदेवाला समर्पित असून, यंदाच्या वर्षी हनुमान जयंती शनिवारी येणे शुभ मानले गेले आहे. शनीच्या ढिय्या, साडेसाती, महादशा, अंतर्दशा सुरू असलेल्या व्यक्तींना शनीदेवाचे काही उपाय करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. (Shani Dev Upay on Hanuman Jayanti 2022)
- हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन देवासमोर दिवा लावावा. शक्य असल्यास ११ वेळा हनुमान चालिसा पठण करावी. असे केल्याने शनी दोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते.
- हनुमान जयंतीला गुलाबाच्या फुलाचा हार हनुमंतांना अर्पण करावा. तसेच ११ पिंपळाच्या पानावर रामनाम लिहून मारुतीला अर्पण करावी. असा उपाय शनी महादेशाचा प्रभाव कमी होण्यास उपयुक्त ठरू शकतो.
- हनुमान जयंतीला मारुतीसमोर दिवा लावताना त्यात दोन लवंग ठेवाव्यात. त्याने हनुमंतांची आरती करावी. असे केल्याने शनी दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो, असे सांगितले जाते.
- हनुमान जयंतीला बजरंगबलींना नारळ अर्पण करावा. तो नारळ ७ वेळा ओळावून तिथेच फोडावा. असे केल्याने समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- हनुमंतांना चणे आणि बुंदी खूपच प्रिय असल्याचे मानले जाते. हनुमान जयंतीला या दोन गोष्टींचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. असे केल्याने मारुतीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात.
- सदर माहिती ज्योतिषीय, धार्मिक मान्यता आणि सामान्य गृहीतकांवर आधारित असून, आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, परंपरा यांप्रमाणे करण्याचा सल्ला दिला जात आहे.