आपण संत महंतांची, अवतारी पुरुषांची, ऐतिहासिक, सामाजिक स्तरावर लौकिक मिळवलेल्या व्यक्तींची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. मात्र हनुमंतरायाची जयंती साजरी करू नये तर जन्मोत्सव साजरा करावा अशा आशयाचे संदेश आपल्याला वाचायला मिळतात. त्यामागचे कारण जाणून घेऊ!
चिरंजिवी अर्थात अमर असणारे सात जीवच या मर्त्य लोकात आहेत. बाकी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. तसे असूनही या सात जीवांनी आपल्या पुण्याईने चिरंजिवित्त्व प्राप्त केले. ते सप्तचिरंजीव म्हणजे-
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च बीभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तेतै चिरंजीविन:।।
सात चिरंजिवांसाठी हा श्लोक प्रसिद्ध आहे. अश्वत्थामा, बली राजा, महर्षी व्यास, बीभीषण, हनुमान, कृपाचार्य आणि परशुराम! पैकी हनुमानाला चिरंजिवी होण्याचा वर कसा मिळाला, याबाबत कथा सांगितली जाते-
रावणाला पराभूत करून आल्यावर सर्व वानरसेनेचा गौरव सीतामाईने भेटवस्तू देऊन केला. परंतु हनुमानाच्या अपूर्व कार्याची जाणीव ठेवून त्याला म्हटले, `हे हनुमंता तुझ्या एकेक उपकारासाठी मी एकेक प्राण दिला तरी त्या उपकारांची परतफेड होणे शक्य नाही. कारण प्राण पाच आहेत आणि तुझे उपकार अनंत आहेत.'
अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांच्या प्रीतीला आणि विश्वासाला जो पात्र ठरला त्या हनुमंताचे गुणवर्णन खरोखर कोणत्या शब्दात करावे?
आपल्या या अपूर्व गुणांनीच त्याला चिरंजीवपद प्राप्त झाले. राायणाच्या अखेरीस प्रभु रामचंद्रांजवळ वर मागताना हनुमान म्हणतो, `हे प्रभो, माझे प्रेम आणि भक्ती सदैव आपल्या ठायी राहावी. माझ्या अंत:करणाचा भाव अन्यत्र कधीही न वळावा. जोवर रामकथा जगात राहतील तोवर माझे शरीर जीवंत राहावे आणि मी जीवंत असेपर्यंत आपल्या भक्तांनी आपले चरित्र मला ऐकवत राहावे. यापुढचे सारे जीवन यापद्धतीने ऐकण्याची माझी ईच्छा आहे.'
त्याचे हे शब्द ऐकताच श्रीरामांनाही गहिवरून आले आणि ते ताबडतोब सिंहासनावरून उठले आणि त्यांनी आपल्या त्या परमप्रिय भक्ताला गाढ आलिंगन देत म्हटले, `हे कपिश्रेष्ठा, तू जे म्हणतोस तसेच होईल!'
श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली.