शनी देव आणि मारुतीरायाची मैत्री आपल्याला माहीत आहेच. अन्य देवांनी जेव्हा शनीचे स्वागत केले नाही तेव्हा मारुती रायाने शनी देवाचे स्वागत केले. तेव्हापासून शनी देवाने मारुती रायाला मैत्रीचा प्रस्ताव दिला. शनी देव म्हणजे संकट म्हणून न पाहता शनी देव म्हणजे संधी, स्वतःला सिद्ध करण्याची, हे मारुती रायने ओळखले आणि त्याच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर प्रसन्न होऊन शनी देवाने त्याला आशीर्वाद दिला, की जो भक्त तुझी उपासना करेल त्याने मी सुद्धा संतुष्ट होईन. एवढेच नाही तर त्याच्यावरील संकटाचे निवारण देखील करेन. यासाठीच २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा.
अनेक लोकांना कुंडलीत शनी दोष असतो तसेच अनेक जण साडेसातीच्या फेऱ्यातून जात असतात. शनी हे न्यायसत्तेचे प्रतिक आहे. शनी न्यायदानाचे कठोरव्रत निर्लेपपणे आचरणात आणतो. म्हणून जगाचे व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. शनीच्या दरबारात प्रकट अप्रकट सर्व सत्याचे शोध घेऊन न्यायदान केले जाते व ते मानवाच्या पारलौकिक गतीसाठी अमृतवत ठरते. त्यामुळे केवळ शनिकृपेसाठी नाही, तर साडेसातीच्या काळात यशाचे प्रधान कारण असणारे मनोबलप्राप्त व्हावे म्हणून काही उपाय सांगितले जातात. शनिवारी हे उपाय करावेच, शिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानेही पुढील उपाय केले असता निश्चितच लाभ होईल.
- आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थरामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे.
- सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥ हा मंत्र जप करणे. तसेच ॐ शं शनैश्चराय नम: नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् । या मंत्रांचा जपही उपयुक्त ठरू शकतो.
- हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
अर्थात, शनीची चांगली वाईट फळे मिळणे हे प्रत्येकाच्या कुंडलीतीळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. शनी करतो, ते चांगल्यासाठी करतो, यावर विश्वास ठेवा. नकारात्मकता दूर सारा. सत्कर्म करत राहा. चांगले विचार, सकारात्मकता बाणवा. चिकाटीने टिकून राहा, स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. सर्वांत महत्त्वाचे साडेसातीला अजिबात घाबरू नका.