२३ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. काळानुकाळ आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच संबोधत आलो आहोत. मात्र अनेकदा शब्दच्छलामुळे उत्सवाचा आनंद बाजूला राहतो आणि विषयांतर घडते. हनुमान जन्मोत्सवाबद्दलदेखील जयंती की जन्मोत्सव हा नवीन वाद निर्माण झाल्यामुळे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी जयंती व जन्मोत्सवाबद्दल मत मांडून या वादावर पडदा टाकला आहे. आपणही सदर माहिती वाचून मनातील संभ्रम दूर करूया आणि या वादाला पूर्णविराम देत उत्सवाचा मूळ उद्देश सफल करूया.
दाते पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात -
◆जो जन्माला येतो त्याची जयंती केली जाते आणि जो मुत्यु पावतो त्याची पुण्यतिथी केली जाते आणि जे समाधि घेतात त्यांचा समाधि उत्सव केला जातो, त्यामुळे जयंती आणि जन्मोत्सव हे समानार्थी शब्द असून विनाकारण शब्दच्छल करुन वेगळा अर्थ काढला जात आहे !
◆ जो मृत्यु पावतो त्याची जयंती साजरी करावी असे कुठेही सांगितलेले नाही . मात्र जो मृत्यु पावतो त्याची जयंती व पुण्यतिथी दोन्ही करता येते
◆जयंती ही सुद्धा उत्सव म्हणूनच साजरी केली जाते तेंव्हा जन्मोत्सव व जयंती हे समानार्थी आहेत, (परशुराम व मार्कण्डेय सुद्धा चिरंजीव आहेत तिथे सुद्धा श्री परशुराम जयंती व मार्कण्डेय जयंतीअसेच म्हटले आहे.)
◆ तसेच अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि जयंती ऐवजी श्रीराम नवमी पण म्हंटले जाते आणि श्रीकृष्ण जयंती ऐवजी श्रीकृष्णाष्टमी असे सुद्धा शब्द प्रयोग केले जातात, तसेच गीता हा ग्रंथ असून मोक्षदा एकादशीला गीता जयंती पण साजरी होते, तेव्हा विनाकारण शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही!
◆ देवता व अवतार यांच्याबाबत उत्सवापेक्षा जयंती साजरी करणे हे अधिक योग्य असणार आहे. कारण जयंतीचे पारणेसुद्धा महत्त्वाचे असते एखाद्या उत्सवाचे पारणे हा शब्दप्रयोग उचित वाटत नाही आता याविषयी विराम!
वरील माहिती वाचून आपल्याही मनातील संभ्रम दूर झाला असेल हे निश्चित! हनुमंताप्रमाणे शक्ती, युक्ती व भक्तीवर लक्ष केंद्रित करूया!