चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव मंगळवारी, २३ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि उपासनाही करतात. हनुमंताच्या पूजेचे नियम थोडे कठीण आहेत. पण त्यांचे पालन केल्याने देवाला प्रसन्न करता येते. यासाठीच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते काम निषिद्ध आहे हे जाणून घेऊ.
हनुमान जयंतीच्या दिवशी पुढील गोष्टी अजिबात करू नका!
>> हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी हनुमंताचे ध्यान करावे. वामकुक्षी घेणे टाळावे.
>> या दिवशी शाकाहाराचा अवलंब करावा. व्यसने करू नये. तसे केल्यास हनुमंताची उपासना पूर्ण होत नाही.
>> हनुमंताच्या भग्न मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करू नका. ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना, पूजा करता येईल.
>> हनुमानाची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका. त्याऐवजी लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घाला.
>> जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका. त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे मनोमन पठण करा.
>> हनुमंताची पाद्यसेवा करू नका. कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो. पाद्यपूजा करायचीच असेल तर श्रीरामांच्या पादुकांची करा आणि हनुमंताची पूजा करून त्याला हरभरा डाळ, गूळ याशिवाय बुंदीचे लाडू, इमरती वगैरे नैवेद्य दाखवू शकता.
>> हनुमंत बालब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमंताला दुरूनच नमस्कार करावा, मूर्तिंस्पर्श टाळावा!
या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून हनुमंत पूजा केल्यास ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल.