२३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्ताने हनुमंताची वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली कथा जाणून घेऊया आणि जन्मोत्सवाच्या तिथीला अर्थात २३ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयाच्या वेळी ६. ४० मिनिटांनी कथेचे पुर्नवाचन करून हनुमंत जन्मोत्सव साजरा करू!
हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती. अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव `पुंजिकस्थला' होते. एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून 'तू वानरी होशील' असा शाप मिळाला. तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला `इच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील' असा उ:शाप मिळाला. त्यामुळे ही अप्सरा कपियोनीत 'कुंजर' या वानराची मुलगी `अंजना' म्हणून जन्माला आली.
अंजनाचा विवाह पुढे वाननराज केसरीशी झाला. तो सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनीसह आला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावण्य पाहिले आणि तो काममोहित झाला. त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला. यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवि उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले.
हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत. प्राचीन काळापासून वैदिक, तांत्रिक, पौराणिक, ललित सर्व प्रकारच्या वाङमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत.
'वाल्मिकी रामायण' हे सर्व रामायणात आद्य मानले जाते. यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही, परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे. यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे. यावरून निष्कर्ष निघतो, की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी. सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो.
आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा.
या विवेवचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल. मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे, की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात.