१२ एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025) अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे. या दिवशी हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते, तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. भजन, कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील ३ गोष्टी आठवणीने घेऊन जा, त्याचे कारणही जाणून घ्या.
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या!
या दिवशी तसेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ अर्पण केले जातात. रुई, तेल आणि शेंदूर! या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल, जाणून घेऊया.
तेल : दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. त्या संबंधी अशी एक कथा आहे, की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तिमुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्राणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्त्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रुढी पडली.
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!
रुई : हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी-हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या विंâवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली.
शेंदूर : हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे-सीतामाईला भाळी कुंकुम शेंदुर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि `माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय?' असे हनुमंताने सीतामाईला विचारले.'असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल' असे सीतामाईने हनुमानाला सांगितले, तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला.
अहिरावण-महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळनगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐन वेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटा केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात-
पाताळ देवता हंता, भव्यसिंदुर लेपना!
याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदुर लावण्याची प्रथा पडली. बजरंग बली की जय!
Hanuman Jayanti 2025: 'बजरंग बली की जय म्हणा' आणि हनुमान जयंतीपासून बलोपासना सुरु करा!